Wednesday , December 19 2018
Breaking News

एमपीएससीची आंदोलने खाजगी क्लासेसवाल्यांची!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत दावा

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाची भरती सुरू करण्याबाबत शासन स्तरावर लवकरच उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले, मात्र ही सध्या सुरु असलेली काही आंदोलने ही खाजगी क्लासेस पुरस्कृत असल्याचा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता. ते म्हणाले की, या सरकारच्या काळात आंदोलन केल्याशिवाय न्याय मिळू शकत नाही, हे कालच्या आदिवासी शेतकरी आंदोलनावरून स्पष्ट झाले. लोकसेवा आयोगाच्या पदांची भरती होत नसल्यामुळे बेरोजगार तरूणांमध्ये प्रचंड असंतोष असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शेकडो तरूणांचा मोर्चा मुंबईला आला आहे. राज्यात सुमारे दीड लाख पदे रिक्त असताना एमपीएससीच्या माध्यमातून केवळ ६९ पदांची जाहिरात देण्यात आली. एकिकडे वर्षाला दोन कोटी नोकरभरतीची घोषणा केली जाते. तर दुसरीकडे शासकीय नोकरभरतीत ३० टक्के कपात करण्याचेही प्रस्तावित केले जाते, ही विसंगती विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

एमपीएससीत काही गैरव्यवहार होत असतील तर ते दूर केले पाहिजेत. परंतु, त्यासाठी अनेक वर्ष स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधःकारमय करणे योग्य नसल्याचेही विखे पाटील म्हणाले. सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात स्पर्धा परीक्षांसाठी जिल्हास्तरावर मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु, भरतीच होणार नसेल तर या मार्गदर्शन केंद्राचा काय उपयोग? अशीही विचारणा विखे पाटील यांनी केली. सरकारने तातडीने भरती करून राज्यातील बेरोजगार तरूणांचा असंतोष कमी करावा. अन्यथा सरकारला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिला. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी भरती करण्याबाबत लवकरच उपाययोजना केली जाईल, असे सूतोवाच केले.

स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचा ‘आक्रोश’
राज्यभरात स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सरकार विरोधात आक्रोश वाढला आहे. स्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रियेविरोधात मुंबईत आज विद्यार्थी ‘आक्रोश मोर्चा’ काढणार आहेत. महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आले. राज्यात गेल्या काही वर्षांपासून विविध विभागातील रिक्त पदे भरली गेलेली नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या मोर्चात राज्यातील सर्व विद्यार्थी संघटना एकत्र येणार आहेत. याआधी एमपीएससी विद्यार्थ्यांनी याच प्रकारचा मोर्चा औरंगाबादमध्ये काढला होता. औरंगाबादमधील मोर्चात हजारोंच्या संख्येत विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर 8 फेब्रुवारीला पुण्यातही एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. मुंबईच्या या मोर्चात जवळपास 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत आपण येथून हलणार नसल्याची प्रतिक्रिया समितीचे बाळासाहेब सानप यांनी दिली.

‘आक्रोश मोर्चा’तील प्रमुख मागण्या :
1. सरळ सेवेतील 30 टक्के कपाती धोरण तात्काळ रद्द करुन जिल्हा परिषद, जलसंपदा, समाजकल्याण, महिला व बालकल्याण इत्यादी सर्वच विभागातील जागा 100 टक्के भराव्यात.
2. शिक्षकांची एकूण रिक्त असलेली 24 हजार पदे केंद्रीय पद्धतीने झालेल्या TAIT द्वारे तात्काळ भरावीत, तसेच जिल्हा परिषदेची व मनपाची एकही शाळा बंद करु नये.
3. सर्व परीक्षा शुल्क 100 ते 200 रुपयांपर्यंतच आकारण्यात यावे.
4. सुशिक्षित बेरोजगारांना प्रतिमाह 2 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा.
5. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील रिक्त जागा SET-NET पास व PHD धारक प्राध्यापकांची तात्काळ भरती करण्यात यावी.
6. MPSC च्या C-SAT या विषयाचा पेपर UPSC च्या धर्तीवर पात्र करण्यात यावा व राज्यसेवेच्या पदाच्या संख्येत वाढ करण्यात यावी. शिवाय, MPSC च्या सर्व पदांसाठी प्रतीक्षा यादी जाहीर करावी.
7. पोलीस भरतीतील पद संख्येत वाढ करण्यात यावी.
8. नोकरी भरतीतील पद संख्येत वाढ करण्यात यावी.
9. नोकरी भरती घोटाळ्यासंदर्भात शासनाने कडक धोरण राबवावे व डमी रॅकेटवर आळा घालावा. सर्व परीक्षा बायोमेट्रीक पद्धतने घ्यावी. परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर बसवावेत.
10. तलाठी भरती राज्यस्तरावर MPSC द्वारे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी.
11. भरती प्रक्रिया संदर्भात तामिळनाडू पॅटर्न महाराष्ट्रात राबवावा व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती योग्यवेळी द्यावी.

About admin

हे देखील वाचा

मी पाकिस्तानी गायक असतो तर बरं झालं असतं – सोनू निगम

मुंबई : प्रेक्षकांना आपल्या आवाजानं मोहित करणार गायक सोनू निगमवर आता स्वत:ला पाकिस्तानी गायक म्हणवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!