ऑनलाईन विदेशी कुत्र मागविणार्‍या वकिलाला 5500 रुपयांचा गंडा

0 1

रामानंदनगर पोलिसांनी ठाण्याहून केली भामट्याला अटक

सोशल मिडीयाच्या आधारावर साधला होता संपर्क 

संशयित न्यायालयीन कोठडीत

जळगाव- एटीएमचा पासवर्ड बदलण्याचा, पैसे काढून देण्याचा बहाणा, एटीएमचा पिननंबर विचारुन, अथवा 17 आकडी नंबर विचारुन यासह फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र चक्क शहरातील एका वकिलाला सोशल मिडीयाच्या आधारावर विदेशी कुत्र्याचे पिलू मिळवून देण्याचे आमिष देत भामट्याने साडेपाच हजारात गंडविल्याचे समोर आले आहे. ठाणे येथील भामट्याच्या रामानंदनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

शहरातील बळीराम पेठ येथील रहिवासी अ‍ॅड. केदार किशोर भुसारी हे कुटुंबासह राहतात. अ‍ॅड. केदार भुसारी यांना विदेशी जातीचे पाळीव कुत्रे पाहिजे होते. इंटरनेटच्या माध्यमातून शोध घेतला असता, त्यांना विजय दशरथ सिंग रा. प्रिन्स प्लाझा, कॅबीन रोड, ठाण यांचा मिळाला. संपर्क साधल्यानंतर व्टिटर, व्हॉटस्अ‍ॅपसह सोशल मिडीयाच्या माध्यमातून सिंग याने भुसारी यांचा विश्‍वास संपादन केला.

भामट्याने खात्यावर मागविले पैसे
सिंग याने भुसारी यांना पाहिजे असलेले विदेशी जातीचे कुत्रे मिळवून देण्याच्या आमिष दाखविले. त्यानुसार त्याने कुत्र्याच्या पिलूची छायाचित्र भुसारी यांना पाठवून त्याच्या खरेदीची 5500 रुपये किंमत सांगितली. भुसारी यांनी त्यास होकार दर्शविला. यानंतर विजय सिंगने भुसारी यांना खातेक्रमांक पाठविला व त्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. अ‍ॅड. भुसारी यांनी 17 जानेवारी 2019 रोजी काव्य रत्नावली चौकातील एचडीएसी बॅकेतून सिंगने पाठविलेल्या खात्यावर पैसे पाठविले.

दीड महिन्यानंतरही कुत्र न मिळाल्याने पोलिसात तक्रार
पैसे खात्यावर जमा केल्यावर दीड महिना उलटूनही विदेशी जातीचे कुत्र मिळाल्याने अ‍ॅड. भुसारी यांना संशय आला. त्यांनी सिंग याला विचारणा केली असता त्याच्याकडून आज पाठवितो, उद्या पाठवितो अशी उडवाउडवीचे उत्तरे मिळाली. यानंतर त्याचा क्रमांकही बंद झाल्याने 5 मार्च रोजी अ‍ॅड. भुसारी यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली.

पोलिसांनी ठाण्याहून केली भामट्याला अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासधिकारी गोपाळ चौधरी यांनी तपासचक्रे फिरविली. मोबाईल लोकेशन, खाते क्रमांक अशा माहितीवरुन संशयिताचा छडा लावला. तो ठाणे येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने चौधरी यांनी गुन्हे शोध पथकातील प्रदीप चौधरी व रविंद्र पाटील या कर्मचार्‍यांसह शनिवारी विजय सिंगला अटक केली. मध्यरात्री अडीच वाजता जळगावला पोहचले. रविवारी सिंग यास न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.