ओलएक्सवर महागडी कार विकण्याच्या आमिषाने 1 लाख 46 हजारांचा गंडा

0

निमखेडीच्या तरुणाची फसवणूक ः सायबर पोलिसांनी राजस्थानातील संशयिताच्या आवळल्या मुसक्या

जळगाव– ओएल एक्स या ऑनलाईन वेबसाईटर हुंडाई गाडी विकायची असल्याचे सांगून गाडीचे बनावट कागदपत्रांच्या आधारावर परन सुनीलराव देशमुख वय 29 रा. निमखेडी जळगाव यांना 1 लाख 46 हजार 700 रुपयांत ऑनलाईन गंडविण्यात आले होते. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात सायबर पोलिसांच्या पथकाने लवदिप लखमीचंद वय 29 रा. खुर्द भांडोर, जिल्हा भरतपुर, राजस्थान च्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यास न्यायालयात हजर केले असता 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बनावट कागदपत्राच्या आधारे फसवणूक

राजस्थानातील संशयित लवदिप लखमीचंद याने महागडी कार विकायची असल्याबाबत ऑनलाईन ओएलएक्स या वेबसाईटवर जाहीरात टाकली. या जाहीरात बघून निमखेडी येथील परन सुनीलराव देशमुख यांनी संबंधित संपर्क क्रमांकावर फोन लावून माहिती घेतली. फोनवर जाहीरात टाकणार्‍या संशयिताने जयकिशन या खोट्या नावाने संपर्क साधला. मी लष्करात सैनिक असून माझी बदली राजस्थानातील जैसलमेर येथे झाली असल्याची खोटी माहिती देवून गाडी विकायचे असल्याचे त्याने सांगितले. परन देशमुख यांनी कारची कागदपत्रे मागविली असता, संशयिताने गाडीची बनावट कागदपत्रे तसेच बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच आर्मीचे कॅन्टीन कार्ड पाठविले. या बनावट कागदपत्रांच्या आधाराने संशयिताने विश्वास संपादन करुन देशमुख यांच्याकडून वेळावेळी 1 लाख 46 हजार 700 रुपये ऑनलाईन पेटीम वॅलेटच्या माध्यमातून उकळले. यानंतर कुठलीही कार मिळत नसल्याने देशमुख यांची फसवणुक झाल्याची खात्री झाली. यानंतर त्यानीं सायबर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.

वर्षभर केला पोलिसांनी सखोल अभ्यास

पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी गुन्ह्यातील संशयिताचा शोध घेण्याबाबत सुचना तसेच मार्गदर्शन केले. त्यानुसार सायबर ठाण्याचे पोलीस निरिक्षक बळीराम हिरे यांच्यासह कर्मचार्‍यांनी वर्षभर गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण व सखोल अभ्यास केला. वर्षभराच्या अभ्यासाअंती गुन्हा राजस्थानातील भरतपूर येथील लवदीप लखमीचंद याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बळीराम हिरे यांनी राजस्थानात पोलीस उपनिरिक्षक अंगद नेमाने, दिलीप चिंचोले, श्रीकांत चव्हाण, गौरव पाटील, पंकज पाटील यांचे पथक रवाना केले. पथकाने दोन दिवस मुक्काम करुन राजस्थानात ठिकठिकाणी संशयित लखमीचंदचा शोध घेतला. 6 रोजी भांडोर येथून पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे महागडे चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची 10 पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.