ओव्हरटेकच्या नादात ट्रक समोरासमोर भिडले ; तब्बल 12 तासानंतर वाहतूक सुरळीत

0

जळगाव- नाशिककडे जात असलेला सिमेंटचा ट्रक ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणार्‍या दोन ट्रकांवर आदळून तिहेरी अपघात झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास घडली. या भिषण अपघात धडक देणारा व समोरील एक ट्रक या दोन्ही वाहनांचे चाके निखळून पडल्याने रस्त्यात उभ्या अपघातग्रस्त वाहनांमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अखेर क्रेनने अपघातग्रस्त वाहने हटविण्यात येवून महामार्ग पोलिसांच्या अथक प्रयत्नामुळे तब्बल 12 तासानंतर दुपारी 1 वाजता वाहतूक सुरळीत झाली. या अपघातात धडक देणार्‍या ट्रकच्या चालकाचा पायाचे हाड मोडले असून ट्रकांचे समोरील बाजूचे नुकसान झाले आहे. दरम्यान अपघातामुळे महामार्गावर प्रवास करणार्‍या वाहनधारकांसह विद्यापीठाचे कर्मचारी तसेच रविवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी आलेल्या उमेदवारांचे चांगलेच हाल झाले.

नाशिककडे जाणार्‍या सिमेंटच्या ट्रकमुळे अपघात
नाशिक येथील डी.के.सोमाणी यांचा ट्रान्सपोर्टचा ट्रक (क्र.एमएच.15.इ जी.5256) हा जिल्ह्यातील नशिराबाद येथे ओरीयन कंपनी येथे सिमेंट घेण्यासाठी आला होता. शनिवारी रात्री 12.30 वाजता ट्रकमध्ये 520 गोण्या माल भरल्यावर चालक राजू शेख नाशिककडे निघाले. यादरम्यान बांभोरी पूल ओलांडल्यावर ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रकने समोरुन सुरतकडून कोलकाताकडे जात असलेला ट्रक (क्र. डब्ल्यूबी.23.डी.1862) पाळधीकडून जळगावकडे जात असलेली ट्रक (क्र.एमएच.19.झेड.3359) या दोन्ही वाहनांना धडक दिली.

दीड तासानंतर अडकलेल्या चालकाला काढले बाहेर
चालकाच्या प्रसंगावधाने ट्रक अपघातातून बचावला. मात्र नाशिक व बंगालचा ट्रकची समोरासमोर धडक होवून भिषण अपघातात ट्रकांची समोरील बाजू चक्काचूर झाली होती तसेच दोघांचे समोरील चाके अक्षरखा निखळून पडली होती. यात बंगालचा ट्रक चालक बचावला मात्र धडक देणार्‍या नाशिकच्या ट्रकचा चालक राजू शेख हा ट्रॅकच्या कॅबिनमध्येच अडकला. तब्बल दीड तासानंतर रस्त्यावरुन ये-जा करणार्‍या नागरिकांच्या सहकार्याने महामार्ग पोलिसांनी त्याला ट्रकमधून बाहेर काढले. व रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलविले. नागरिक बाहेर काढत असतानाच्या भयंकर वेदनामुळे बेशुध्द पडल्याचे जखमी शेख यांनी बोलतांना सांगितले.

महामार्ग पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न, 12 तास घटनास्थळावर
रात्री एक वाजेच्या अपघातानंतर अपघातग्रस्त वाहने रस्त्यातच असल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सकाळपर्यंत शिवकॉलनी स्टॉपपासून ते दुसर्‍या बाजूने एकलग्न गावापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त वाहनांचे चाके तुटून पडल्याने वाहने बाजूलाही करता येत नव्हती. त्यामुळे सकाळपर्यंत या मार्गावरील सर्व वाहतुकीचा खोळंबा झाला. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार गुलाब मनोरे, एएसआय दत्तू खैरनार, युसूफ शेख, घनशाम पाटील, हेमंत महाडीक, आसिफ काझी, पवन तडवी, हिरालाल ऊमळकर, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळ गाठले. अपघातग्रस्त वाहनांचे चाकेच निखळल्याने कर्मचार्‍यांचा नाईलाज झाला. वाहनांना हलविण्यासह वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सर्व कर्मचार्‍यांनी शर्थीचे प्रयत्न केले. सकाळी 7 वाजेच्या सुमारास तीन क्रेन घटनास्थळी मागविण्यात आल्या यानंतर दुपारी 1 वाजता अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर तब्बल 12 तासानंतर वाहतुक सुरळीत झाली. रात्रभर तब्बल 12 महामार्ग पोलीस घटनास्थळावरच थांबून होते.

जखमी चालकाचे 32 हजार 500 रुपये लांबविले
राजू चाँद शेख हे नाशिकहून अकोला जिल्ह्यातून बाळापूर येथे एका कंपनीत रासायनिक खताचा माल पोहचविण्यासाठी गेले होते. माल उतरविल्यावर मालाचे 32 हजार 500 रुपयांचे पेमेंट घेतले. व पुन्हा नाशिककडे परतत असताना मालक डी.के.सोमाणी यांचा फोन आला. त्यांनी सांगितल्यानुसार रात्री नशिराबादहून सिमेंटचा माल भरला. दरम्यान जखमी अवस्थेत कोणीतरी त्यांच्या खिशातील 32 हजार 500 रुपयांचे लांबविल्याचे राजू शेख यांनी सांगितले. बाळापूरला दुसर्या सहकार्याला 4600 रुपये दिल्याने ते वाचचे व तेवढेच पैसे या ट्रीपमधून मालकाच्या हातात लागल्याचेही तो म्हणाले.

माणुसकी संपली काय?
दरम्यान जखमी अवस्थेत मालकाला फोन लावण्यासाठी घटनास्थळावर तसेच रुग्णालयात विचारले असता अनेकांकडून नकार मिळाल्याचेही तो म्हणाला. यानंतर सकाळी मालकाशी बोलणे झाले. त्यानुसार मालक जळगावात आले होते. दुसर्या वाहनातून त्यांनी माल हलविला असल्याचीही माहिती मिळाली. रात्री 3 वाजेपासून जिल्हा रुग्णालयात आणून टाकले मात्र दोन इंजेक्शन देण्याव्यतिरिक्त सकाळी 12 वाजेपर्यंत कुठलेही उपचार करण्यात आल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला. नाशिक जिल्ह्यातला असतानाही मालकाला फोन लावण्याइतपतही लोकांनी माणुसकी न दाखविल्याने तसेच खिशातील पैसे काढून घेतल्याने माणुसकी संपली की काय? असा सवालही शेख याने उपस्थित केला.

वाहनधारकांनी धरला नदीचा रस्ता
वाहतुकी ठप्प झाल्यामुळे समोर जाता येत नव्हते. कार्यालयात, विद्यापीठात कामावर जाणे महत्वाचे असल्याने अनेक विद्यार्थ्यांसह कंपनीच्या कामगारांनी नदीतून वाट काढली होती. वाहतूक सुरळीत येण्यास उशीर लागणार असल्याचा अंदाज धरत नागरिकांनी मिळेल त्या रस्त्याने वाहने काढली. यावेळी नदीतही वाहनांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.