ओव्हरलोड वाहनांच्या हप्तखोरीत परिवहन आयुक्त कार्यालयाचीही ‘सेटींग’

0

वर्षभरात एकदाच येवून भरारी पथकाकडून कारवाईचा कांगावा ; उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांवर कारवाईकडे दुर्लक्ष

जळगाव- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात जर गैरव्यवहार होत असेल आणि यात कर्मचारी, अधिकार्‍यांचा सहभाग असेल तर त्यांच्यावर कारवाईची जबाबदारी परिवहन आयुक्त कार्यालयाची आहे. मात्र ओव्हरलोड वाहनांच्या हप्तेखोरीत ‘दाल मे कुछ काला नही, तो पुरी दालच काली’ याप्रमाणे परिवहन आयुक्त कार्यालयाचीही हप्तेखोरीत सेटींग असल्याची चर्चा आहे. वर्षभरात एकदा जिल्ह्यात येणारे परिवहन आयुक्त कार्यालयाचेही भरारी पथक नावालाच कारवाई करुन आपला रक्कमेचा हिस्सा घेवून जात असल्याचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे ज्या वरिष्ठ कार्यालयाला संबंधितांवर कारवाईचे अधिकार आहे, त्याच कार्यालयाचे जर गैरव्यवहारात ‘हात ओले’ असतील तर संबंधित उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांवर कारवाई करणार कोण? असा प्रश्‍न अनेकांमधून उपस्थित होत आहे.

येतोय असे सांगून धडकते परिवहन आयुक्त कार्यालयाचे भरारी पथक
परिवहन आयुक्त कार्यालयाच्या भरारी पथकाने सरप्राईज भेट देवून अचानकपणे कारवाई करणे अपेक्षित असते. कारवाई केल्याबाबत पथकाला परिवहन आयुक्तांना हिशोबही द्यायचा असतो. मात्र कारवाईसाठी येणारे पथक येण्यापूर्वी आपण येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी कर्मचार्‍यांना देवून टाकते. यानंतर नावालाचे आलेले भरारी पथक आयुक्तांना कारवाई केल्याचा हिशोब द्यावयाचा असल्याने वाहनांवर कारवाई केल्याचा कांगावा करते. व नियोजनानुसार या भेटीत आपल्या रक्कमेचा हिस्सा घेवून जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे ओव्हरलोड वाहनांच्या हप्तेखोरीत सहभागी अधिकारी कर्मचार्‍यांवर कारवाई होणार तरी कशी? हा मात्र संशोधनाचा विषय आहे.

भरारी पथकाची ‘उल्लू बनाईंग’ कारवाई
परिवहन आयुक्त कार्यालयाच्या भरारी पथकाने जर ओव्हरलोड वाहनांवर कारवाई केली तर जागेवर संबंधित वाहनाच्या चालक, मालकांकडून नियमानुसार दंड वसूल केला जातो. कारवाई झालेले ओव्हरलोड वाहन हप्तेवसुलीची जबाबदारी असलेल्या खाजगी व्यक्तीच्या यादीतील असेल तर, तो महिनाभराची हप्तेवसुलीची पूर्ण रक्कम जमा करतांना, भरारी पथकाकडून झालेल्या कारवाईची दंडाची रक्कम परस्पर एकूण रकमेतून कापून घेतो. अशा प्रकारे इतरांना कारवाई होत असल्याचे दाखविणार्‍या भरारी पथकाच्या तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ‘उल्लू बनाईंग कारवाईची’ही एकच चर्चा आहे.

बाहेरील जिल्ह्यातील ओव्हरलोड वाहनांची अशी होते सेटींग
बाहेरुन जिल्ह्यातील ओव्हरलोड वाहन जळगाव जिल्हयात येत असेल तर संबंधित वाहनांचा मालक हप्ते वसुल करणार्‍या जळगावातील खाजगी व्यक्तीचा संपर्क क्रमांक मिळवतो. त्यानुसार संपर्क साधून खाजगी व्यक्तीला वाहन क्रमांक देतो, तसेच चालकासोबत ओव्हरलोड वाहनाच्या प्रकारानुसार ठरलेली रक्कमही देत असल्याची माहिती देतो. त्यानुसार वाहन जिल्ह्यात एन्ट्री करते. त्यानुसार जिल्ह्यातून बाहेर जाणार्‍या ओव्हरलोड वाहनांची सेटींग होत असल्याची चर्चा आहे.

जनशक्ति’च्या मालिकेने धाबे दणाणले
ओव्हरलोड वाहनांच्या माध्यमातून होत असलेल्या हप्तेखोरी सारख्या गैरव्यवहाराला दैनिक जनशक्तिने वाचा फोडली आहे. जनशक्तिच्या वृत्त मालिकेने उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांसह येथील वाहन निरिक्षक तसेच कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले असून ओव्हरलोड वाहनांच्या हप्तखोरीसाठी वापर होत असलेल्या खाजगी व्यक्तींमध्येही मालिकेने खळबळ उडाली आहे. अनेक जण एकमेेकांना फोनाफानी करुन संबंधित वृत्तांबाबत चर्चा करत असल्याची तसेच वृत्त छापून आल्याबाबत माहिती देत असल्याचे दिसून येत आहे. या मालिकेचे नागरिकांकडून स्वागत होत असून अनेक जण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील इतरही गैरव्यवहाराबाबत माहिती देण्यासाठी प्रतिनिधीला फोन करत आहेत.