कंपनीची फसवणूक ;ट्रान्सपोर्ट विरोधात गुन्हा दाखल

0

माल परत न करता 42 लाखांची मागणी

जळगाव :- बिहार राज्यातील सिमीलीया रिसर्च लॅबॉरेटरी प्रा.लि. कंपनीला शहरातील एमआयडीसीतील सिध्दार्थ कार्बोकेम कंपनीकडून 18 लाख 36 हजार 198 रुपयाचे मिथाई सिलीसीलेट रसायन पाठवण्यात आले होते. मात्र बिहारच्या कंपनीने मागणीनुसार हा माल घेतला नाही व पुन्हा परत पाठविला. परततांना जीएसटी विभागाने माल जप्त केल्याने तो सोडविण्यासाठी कंपनीला ट्रान्सपोर्ट कंपनीच्या सांगण्यानुसार 2 लाख 80 हजार 98 रुपये दंड भरावा लागला. मात्र यानंतरही ट्रान्सपोर्ट कंपनी सिध्दार्थ कार्बोकेम कंपनीला माल परत न करता उलट 42 लाखांची मागणी करत असून या ट्रान्सपोर्ट विरोधात कंपनीच्या विधी अधिकार्‍यांनी केलेल्या तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागणी करुन माल केला रिजेक्ट

सिद्धार्थ कार्बोकेम प्रा.लि. कंपनीचे विधी अधिकारी जितेंद्र सुभाष वाणी यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे, बिहार येथील सिमीलीया रिसर्च लॅबोरेटरी प्रा.ली कंपनीचे अधिकारी प्रशांत रमेशचंद्र तोडा यांनी 28 सप्टेंबर 2019 रोजी भास्कर मार्केट येथील कार्यालयात सिद्धार्थ कार्बोकेमचे अधिकारी गिरधर निकम यांच्याशी बोलणी झाली होती. त्यानुसार 18 लाख 36 हजार 198 रुये किंमतीचे 5 हजार 985 किलोग्रॅम मिथाईल सॅलीसीलेट बिहार येथील सिमीलीया रिसर्च लॅबोरेटरीज्ला (6 ऑक्टोबर)पाठवण्यात आले होते. मात्र कंपनीने हा सर्व माल रिजेक्ट करुन परत पाठवला.

ट्रान्सपोर्ट कडून 42 लाख 21 हजाराची मागणी

परतीच्या मालावर कानपुर येथे जीएसटी विभागाने छापाटाकून मुदतबाह्य बिल असल्याने माल पकडला. ट्रान्स्पोर्टच्या चुकीमुळे हा माल पकडला गेला असला तरी, ट्रान्स्पोर्ट कंपनीने आम्हाला विश्वासात घेत त्या मालावर 2 लाख 90 हजार 98 रुपये दंड भरुन द्या तो, दंड नंतर तुम्हाला परत मिळेल असे सांगीतल्याने ईच्छा नसतांना हा दंडही कंपनीने भरला. तरी सुद्धा अद्याप माल परत मिळाला नसून चौकशी केल्यावर ट्रान्सपोर्ट कंपनीने आणखी 42 लाख 21 हजार 69 रुपयांची मागणी केल्यावरुन या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ट्रान्सपोर्ट कंपनी विरुद्ध तक्रार देण्यात आल्याने गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.