कर बुडवे, कर चुकव्यांकडून 100 टक्के कर वसुली करणार

0

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त हर्डीकर यांची माहिती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही. कर बुडवे, कर चुकवे यांच्या मागे लागून 100 टक्के कर वसूली करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच अधिकृत, अनधिकृत मालमत्ता शोधून त्यांची नोंदणी केली जाणार आहे. मालमत्ता करातून उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. उत्त्पन्नाचे स्त्रोत वाढवून अनावश्यक खर्च टाळण्यावर भर दिला जाईल. गेल्यावर्षीच पाणीपट्टीत वाढ केली होती. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात पाणीपट्टीत कोणतीही वाढ केली नाही. यंदाचा अर्थसंकल्प ’कॅश फ्लो’ संकल्पनेवर आधारित असे त्यांनी यावेळी सांगितले.

उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणार!
महापालिका आजपर्यंत पार्किंग शुल्क आकारत नव्हती. त्यामुळे पार्किंगच्या मोबदल्यात महापालिकेला उत्पन्न मिळत नव्हते. आता महासभेत पार्किंग पॉलिसी मंजूर केली आहे. त्यातून उत्पन्न मिळणार आहे. या उत्पन्नाचा सार्वजनिक वाहतूक किफायतशीर राहण्यासाठी उपयोग केला जाणार आहे. वैद्यकीय सुविधा वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याच्या माध्यमातून देखील उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येईल.

भाडेतत्त्वाचे धोरण
भूमी – जिंदगी विभागातील आपल्या मालमत्ता, त्यांचा वापर, कालावधी अशी एकत्रित माहिती उपलब्ध नव्हती. त्याचे आता सुसूत्रीकरण करणार आहे. गाळे, इमारती, भाजी मंडई, इमारती याची माहिती एकत्रित करून ते भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार गाळे आणि ओटे भाडेतत्त्वावर दिले जाऊन उत्पन्नवाढीवर जोर दिला जाणार आहे, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.