कागदोपत्रीच हजर राहणार्‍या डॉक्टरांची कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत दांडी…

0

कोरोनाशी लढा अन् जिल्हा रुग्णालयात काही डॉक्टर गंभीर नाहीच ; गैरहजर कर्मचार्‍यांना नोटीसा, डॉक्टरांना अभय

जळगाव : राज्यशासनासह जिल्हा प्रशासन असे सर्वच कोरोना पार्श्‍वभूमिवर गंभीर आहेत. मात्र आरोग्य यंत्रणेतील महत्वाचे घटक समजले जाणारे जळगाव जिल्हा रुग्णालयात काही डॉक्टरांना याचे गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे. इतरवेळीची कागदोपत्री हजर राहून लाखोंचा पगार घेणारे डॉक्टर कोरोना आजारासारख्या गंभीर परिस्थितही गैरहजर आहेत. मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश असतांनाही या आदेशाला संबंधितांकडून हरताळ फासला जात आहे. गैहजर राहणार्‍यांना निलंबित करण्याचे आदेशानंतरही वरिष्ठ संबंधितांवर कुठलीही कारवाई करत नसून उलट नेहमीप्रमाणे त्यांना यावेळीही वाचवित आहेत, हे विशेष.

कर्मचार्‍यांना नोटीस, डॉक्टरांचा बचाव

कोरोना या आजाराशी मुकाबला करण्यासाठी सरकारी कार्यालयात फक्त 5 टक्के कर्मचारीच हजर असतील असे शासनाने आदेश काढलेले आहेत. जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयांना मात्र यातून वगळण्यात आले आहे. आरोग्य विभागातील डॉक्टर व संबंधित कर्मचार्‍यांनी जातीने हजर राहण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश आहेत. असे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात तब्बल 40 टक्के कमर्र्चार्‍यांनी दांडी मारल्याचा प्रकार नुकताच समोर आला. दांडी मारणार्‍यांमध्ये काही डॉक्टरांचा समावेश आहे. यात अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी कर्मचार्‍यांना नोटीस बजावून आपणाविरुध्द शिस्तंभगाची कारवाई का करु नये? असा जाब विचारुन दोन दिवसात खुलासा मागितला आहे. तर दुसरीकडे यातील डॉक्टरांना मात्र कारवाईतून वगळण्यात आले.

’त्या’डॉक्टरांना कोणाचे अभय

कोरोना या आजाराशी दोन हात करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेत आहे. मंत्रालयाने डॉक्टर व संबंधित कर्मचार्‍यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश दिलेले आहेत, असे असतांना काही डॉक्टरांना मात्र याबाबत कुठलेही गांभीर्य नसून मनमानी पध्दतीने रुग्णालयाकडे फिरकून पहायला सुध्दा तयार नाही. संबंधितांना कोणाचे अभय हा प्रश्‍न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

संबंधित डॉक्टरांवर कारवाईच्या इंजेक्शनची गरज

जिल्हा रुग्णालयात महिला व प्रसुती विभागातील अनेक डॉक्टर कागदोपत्री हजर असतात. नोकरीसोबतच संबंधितांचे जामनेर, धुळे येथे खासगी दवाखाने सुरू आहे. त्यांचे वेतन लाखांच्या घरात असून प्रत्यक्ष हजर न राहता कागदोपत्री हजर असल्याचे दाखवून लाखांचा पगार वसूल करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कागदोपत्री हजर दाखविण्याच्या या प्रकारात वरिष्ठांचेही आर्थिक लागेबांधे असल्याचे समजते. अशा संबंधित डॉक्टरांना वरिष्ठांकडून का अभय मिळत आहे? नेहमी अभय मिळत असल्यानेच संबंधितांची मनमानी वाढली आहे. अशाप्रकारे संबंधित दांडी बहाद्दर डॉक्टर व त्यांना अभय देणार्‍या वरिष्ठांवर जिल्हाधिकार्‍यांकडून चौकशी होवून कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.