Wednesday , December 19 2018
Breaking News

काठमांडूत भीषण विमान अपघात, 50 ठार

बांगलादेशावर शोककळा; उतरताना धावपट्टीनजीक कोसळले
त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दुर्घटना, 17 प्रवासी बचावले

काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडूनजीकच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी घेऊन येणारे बांगलादेशचे प्रवासी विमान खाली उतरत असताना धावपट्टीवर कोसळून झालेल्या भीषण अपघातात 50 प्रवासी ठार झाले तर 17 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती विमानतळाचे प्रवक्ते प्रेमनाथ ठाकूर यांनी दिली. हे विमान यूएस-बांगला एअरलाईनचे होते. खाली उतरत असताना ते अचानक डळमळीत झाले आणि जवळच असलेल्या फूटबॉल मैदानावर कोसळले. विमानाला लागलेल्या आगीत 50 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. नेपाळ सेना व स्थानिक सुरक्षा कर्मचार्‍यांनी तातडीने मदतकार्य हाती घेतले व 17 प्रवाशांना वाचविण्यात आले. या विमानात क्रू मेंबरसह 67 प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती देण्यात आली. या विमानाने ढाका येथून उड्डाण भरले होते तर दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी ते त्रिभुवन विमानतळावर उतरणार होते. या घटनेने बांगलादेशात शोककळा पसरली होती. भारतानेदेखील आपला शोक व्यक्त केला आहे.

तांत्रिक बिघाडामुळे अपघाताची शक्यता
विमानतळ प्रवक्ते प्रेमनाथ ठाकूर यांनी सांगितले, की ढाका येथून आलेल्या या विमानाला धावपट्टीच्या दक्षिण बाजूने खाली उतरण्यास सांगण्यात आले होते. परंतु, हे विमान उत्तर बाजूने खाली उतरत होते. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ढाका येथून विमानात एकूण 67 प्रवासी बसलेले होते. त्यात 37 पुरुष, 27 महिला आणि दोन मुलांसह चार क्रू मेंबरचा समावेश होता. पैकी 17 गंभीर जखमींना वाचविण्यात यश आले असून, त्यांना काठमांडूतील रुग्णालयांत दाखल करण्यात आलेले आहे. विमान दुर्घटनेनंतर विमानतळ तातडीने बंद करण्यात आले होते. विमान कोसळताच त्याला आग लागली, त्यामुळे तातडीने अग्निशमन बंब पाठविण्यात आले. नेपाळ सेना व सुरक्षा कर्मचार्‍यांनी विमानाचा पत्रा कापून आत प्रवेश केला व जळालेले मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले. विमानात 31 प्रवाशांना जळून मृत्यू झाला होता, तर उर्वरित 19 प्रवासी हे रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान दगावले आहेत, असे पोलिसांचे प्रवक्ते मनोज नेउपने यांनी सांगितले.

नेपाळमध्ये विमान अपघात वाढले
नेपाळमध्ये विमान दुर्घटना होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, डोंगराळ भाग असल्याने असे प्रकार होत आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, यूएस-बांगला एअरलाईन्सचे हे विमान चुकीच्या बाजूने खाली उतरत होते. खाली येत असताना अचानक हे डळमळू लागले, आणि शेजारीच असलेल्या फूटबॉल मैदानात कोसळले. त्यानंतर आग लागली, या आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत होते. हे चित्र पाहाता, विमानातील कुणीही बचावण्याचे शक्यता धूसर होती. यापूर्वी 2016 मध्येही दोन इंजिनचे एअरक्राफ्ट पहाडी भागाला टक्कर देऊन कोसळले होते. त्यात 23 प्रवासी ठार झाले होते. तर दोन दिवसापूर्वी एक छोटे विमान कोसळून दोन पायलट जागीच ठार झाले होते. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

About admin

हे देखील वाचा

मी पाकिस्तानी गायक असतो तर बरं झालं असतं – सोनू निगम

मुंबई : प्रेक्षकांना आपल्या आवाजानं मोहित करणार गायक सोनू निगमवर आता स्वत:ला पाकिस्तानी गायक म्हणवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!