कोरोना : सचिन, रैना, रहाणेपेक्षा रोहित मदतीत सरस

0

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सरकारच्या मदतीला क्रीडा जगतातील अनेक खेळाडू सरसावले आहेत. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे, गौतम गंभीर, युसूफ व इरफान पठाण यांच्यानंतर आता हिटमॅन रोहित शर्मानेही चार संस्थांना आर्थिक मदत जाहीर केली. विशेष म्हणजे रोहितने केलेली मदत ही सचिन, रैना, रहाणे यांच्यापेक्षा अधिक आहे. रोहितने पंतप्रधान सहाय्यता निधीत ४५ लाखांची मदत केली. शिवाय त्याने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपये दिले. याशिवाय झोम्याटो फिडींग इंडीया तसेच भटक्या कुत्र्यांसाठी कार्य करणार्‍या संस्थेला प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली. रोहितने एकूण ८० लाखांची मदत केली.
सचिन तेंडुलकरने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रत्येकी २५ लाखांची मदत केली आहे. विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी मिळून पंतप्रधान व महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत हातभार लावला आहे. त्यांनी नेमकी किती मदत केली हे जाहीर केलं नाही, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार ही मदत ३ कोटींची आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने ५२ लाखांची मदत केली आहे. यापैकी ३१ लाख हे पंतप्रधान सहाय्यता निधीत, तर २१ लाख उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जाणार आहेत. अजिंक्य रहाणेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १० लाखांची मदत केली आहे. भारताचा माजी सलामीवीर आणि खासदार गौतम गंभीरने त्याच्या फंडातून १ कोटींची मदत दिल्ली सरकारला केली आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं ५० लाख रुपयांचे तांदुळ गरजूंना दान केले आहेत. बीसीसीआयने त्यांच्या संलग्न संघटनांसह मिळून ५१ कोटींची मदत केली. मुंबई क्रिकेट असोसिएशनने राज्य सरकारला ५० लाखांची मदत केली.


१६ वर्षीय भारतीय महिला क्रिकेटपटू रिचा घोषने १ लाखांची मदत केली. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने १० लाखांची मदत केली. भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने उभ्या केलेल्या चळवळीतून १.२५ कोटी जमा झाले आहेत. बॉक्सर मेरी कोमनं एका महिन्याचा पगार व १ कोटी, बॅटमिंडनपटू पी व्ही सिंधूने १० लाख आणि कुस्तीपटू बजरंग पुनियाने सहा महिन्याचा पगार दिला आहे.