कार्यकर्तांचा आग्रह अन्‌ नातवाचा हट्ट, पवारसाहेब पुर्ण करणार का?

0

पिंपरी – आगामी लोकसभेची निवडणूक पार्थ पवार लढविणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वो शरद पवार यांनी स्पष्ट केले असले तरी पार्थ यांनाच उमेदवारी देण्याचा हट्ट कार्यकर्त्यांनी धरला आहे. गट-तटात विभागलेल्या नेत्यांना एकत्र आणण्यासाठी पार्थ यांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशी जोरदारपणे मागणी केली जात आहे. मावळमध्ये तर पार्थ यांना उमेदवारी देण्याबाबतचा ठराव केला. शहरातील काही नगरसेवकांनी जाहीरपणे पार्थ यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह आणि नातवाचा हट्ट शरद पवार पुर्ण करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नातवासाटी पवारसाहेब आपला निर्णय बदलणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मावळ मतदारसंघ 2009 मध्ये अस्तित्वात आल्यानंतर राजकीय ताकद असतानाही 2009 आणि 2014 च्या झालेल्या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. राष्ट्रवादीतील गटबाजी, नेत्यांमधील मतभेद यामुळेच पक्षाच्या उमेदवाराचा दोन्हीवेळेस पराभव झाला. त्यामुळे मावळातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ आगामी लोकसभा निवडणूक असणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. पार्थचा मतदार संघात राबता वाढला होता. नेत्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या होत्या. तसेच पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण मावळातून लोकसभेची निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे पार्थ यांनी सांगितले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. आता मावळात फक्त पार्थ असा नारा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देत होते.

परंतु, काही दिवसांपुर्वी शरद पवार यांनी पवार कुटुंबातून आपण एकमेवच लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पार्थ यांचे नाव मागे पडले होते. कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजी पसरली होती. परंतु, पवार यांनी स्पष्ट केल्यानंतर देखील कार्यकर्त्यांनी पार्थ यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला आहे. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत तर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याबाबत ठरावच करण्यात आला. हा ठराव शरद पवार यांना पाठविला जाणार आहे.

राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे यांनी देखील पार्थ पवार यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. आजवर मतांची विभागणी आणि बंडखोरी झाल्याने अपयश आले आहे. भाजप आणि शिवसेनाला या मतदारसंघात थोपवायचे असेल तर पार्थच योग्य उमेदवार असणार आहेत. पार्थ यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास कोणत्याही प्रकारची बंडखोरी होणार नाही. तसेच इतर पक्षांचीही मदत मिळेल, असा त्यांचा दावा आहे. सर्व नगरसेवक पवारसाहेबांना भेटून पार्थ यांनाच उमेदवारी देण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबत नगरसेवक राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे यांनी देखील तीच मागणी केली आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांचा आग्रह आणि नातवाचा हट्ट शरद पवार पुर्ण करणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नातवासाटी पवारसाहेब आपला निर्णय बदलणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पार्थ पवार नसतील तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी देखील निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी स्पर्धक निर्माण झाला. या दोघांपैकी एकाला कि पार्थला उमेदवादी दिली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ऐनवेळी आयात उमेदवाराला राष्ट्रवादीचे उमेदवारी!

पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराला लढत देणारा उमेदवार देण्यावर भर दिला जावू शकतो. त्यासाठी शहरातील भाजपमधील एक बडा नेत्याचा विचार केला जावू शकतो. त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी ऐनवेळी आयात उमेदवाराला देखील मिळण्याची शक्यता आहे.