काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान

0

श्रीनगर: पाकिस्तान आपल्या दहशतवादी कारवाया थांबत नसून, आज काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सुरक्षा दलांनी हाती घेतलेलं ‘ऑपरेशन ऑलआऊट’ सुरूच आहे. काश्मीर खोऱ्यातील गांदरबलमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. लष्कर आणि सुरक्षा दलांच्या जवानांनी परिसरात शोध मोहीम सुरूच ठेवली आहे. आज, मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून चकमक सुरूच आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी लष्कर आणि सुरक्षा दलांनी मोहीम हाती घेतली आहे. ‘ऑपरेशन ऑलआऊट’ अंतर्गत दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. काश्मीर खोऱ्यातील गांदरबल खोऱ्यातही आज, मंगळवारी सकाळी सात पासून दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू झाली आहे.

गांदरबलमधील गुंडमध्ये एका घरात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांचे जवान परिसरात पोहोचले. त्यांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले. तर एक जवान जखमी झाला आहे. आणखी दहशतवादी या घरात लपून बसल्याची माहिती मिळते.