काही विषयावर मतभेद मात्र महाविकास आघाडी अभेद्य: अजित पवार

0

बारामती: भीमा-कोरगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यावरून तसेच एनआरसी आणि सीएएवरून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मतभेद दिसून येत आहे. यावरून महाविकास आघाडीचे सरकार अधिक काळ टिकणार नसल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुलासा केला आहे. तीन पक्षाचे सरकार आहे, त्यात काही विषयांवरून मतभेद असू शकतात मात्र महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकेल, महाविकास आघाडीचे सरकार अभेद्य असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीचे मतदान केल्यानंतर ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परस्पर भिन्न मते व्यक्त केली होती. यावरून महाविकास आघाडीत मतभिन्नता दिसून येत आहे. यावर अजित पवारांनी भाष्य केले. महाविकास आघाडी ही काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून समविचाराने आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आली आहे. आम्ही सर्वच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत आहोत. विविध विषयांवर मतभेद असू शकतात. मात्र, महाविकास आघाडी अभेद्य आहे असे त्यांनी सांगितले.