किनगावात डंपर पळवले : तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक

यावल : तालुक्यातील किनगाव येथे वाळू वाहतूक करणारे डंपर महसूल पथकाने अडवल्यानंतर पथकाला हुलकावणी देत चालकाने सुसाट वेगाने डंपर नेत पळ काढला तर या घटनेत महिला बालंबाल बचावल्या. या प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी डंपरमधील क्लिनरला ताब्यात घेत यावल पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून क्लीनर अमोल सपकाळे यास अटक करण्यात आली.

वाळू माफियांची दादागिरी उघड
गुरुवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास वाळूने भरलेले एक डंपर (क्रमांक एमएच.28-7708) जळगावकडून किनगावकडे येत असताना किनगाव मंडळ अधिकारी सचिन जगताप व पथकाने किनगावजळ डंपर अडवल्यानंतर क्लिनर अमोल सपकाळे हा खाली असताना चालकाने सुसाट वेगाने डंपर
जळगावच्या दिशेने नेत पळ काढला. यावेळी रस्त्याने फिरणार्‍या काही महिला थोडक्यात बचावल्या व नंतर संतप्त ग्रामस्थांनी बसस्थानक चौकात गर्दी करत कारवाईची मागणी केली. मंडळ अधिकारी जगताप यांनी पोलिस व तहसीलदार महेश पवार यांना ही माहिती दिली. यानंतर पोलिस निरीक्षक सुधीर पाटील पथकासह किनगाव दाखल झाले व त्यांनी क्लीनरला ताब्यात घेतले. या प्रकरणी क्लीनरला अटक करण्यात आली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.