कुर्‍हाकाकोड्यात शॉर्ट सर्किटे चार दुकाने खाक : 40 लाखांचे नुकसान

0

मुक्ताईनगर- तालुक्यातील कुर्‍हाकाकोडा गावातील मुख्य बाजारपेठेतील कुर्‍हा दूरक्षेत्रासमोरील चार दुकानांना बुधवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटने आग लागल्याने सुमारे 40 लाखांचे नुकसान झाले. सुरुवातीला किराणा दुकानात शॉर्ट सर्किटने होवून आग लागल्याने तब्बल चार दुकानातील साहित्याचा कोळसा झाला तर मध्यरात्री आग लागल्याने आग विझवताना अनंत अडचणी आल्या. कुर्‍हाकाकोडा गावातील अतुल अत्तरदे यांच्या किराणा दुकानात शॉर्ट सर्किट झाल्यानंतर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास आग लागली. आगीची झळ शेजारीच असलेल्या विजय गोसावी यांच्या इलेक्ट्रॉनिक दुकानासह गुलाबसिंग राजपूत यांच्या रंगोली इलेक्ट्रीकल्स व हरसोडा येथील महेंद्र देवकर यांनी भाडे तत्वावर घेतलेल्या मोबाईल दुकानालाही बसली. चारही दुकाने जळाल्याने सुमारे 40 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. पहाटे मलकापूर येथील अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर आग विझवण्यास यश आले. गावातील स्थानिक तरुणांनीही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दरम्यान, कुर्‍हा येथील पोलीस कर्मचारी सुरेश पवार यांनीदेखील आग विझवण्यासाठी जीवाची पर्वा न करता प्रयत्न केले.