कुर्‍हे पाटबंधारे प्रकल्पात बैलगाडी गेल्याने बैलाचा मृत्यू

0

शेतकर्‍यासह पत्नी वाचले प्राण : कुर्‍हे ग्रामस्थांची घटनास्थळी धाव

भुसावळ : तालुक्यातील कुर्‍हेपानाचे येथे पाणी पिताना बैलांनी बैलगाडी ओढळल्याने पाटबंधारे प्रकल्पातील पाण्यात बुडाल्याने बैलाचा मृत्यू झाला तर सुदैवाने शेतकर्‍यासह त्यांच्या पत्नीचे प्राण वाचले. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

शेतकर्‍यांनी धाव घेतल्याने वाचले प्राण
कुर्‍ह्याचे शेतकरी समाधान कालु पाटील हे गुरूवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पत्नीसह खंडाळा रोडवरील शेतातून बैलगाडीवरून घरी येत असताना त्यांनी लघू पाटबंधारे प्रकल्पात बैलांना पाणी पिण्यासाठी गाडी थांबवली होती. यावेळी गाडीला जुंपलेले बैल सोडत असतानाच बैलांनी अचानक पाण्याकडे धाव घेतल्याने बैलगाडी सरळ प्रकल्पात गेली व त्याचवेळी शेतकर्‍याची पत्नीदेखील गाडीवर बसली असल्याने त्यांनी आरडा-ओरड करताच शेजारच्या शेतात उपस्थित असलेले डॉ.रमाकांत पाटील, बाजीराव पाटील यांच्यासह अन्य शेतकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकर्‍यासह त्यांच्या पत्नीचे प्राण वाचवले. दरम्यान, कुर्‍हे गावात बैलगाडी प्रकल्पात गेल्याचे माहिती समजतात ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत बैलाचा मृत्यू झाला होता. मृत बैलाचा पंचनामा करण्यात आला. यावेळी सरपंच रामलाल बडगुजर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुभाष पाटील, कोतवाल प्रकाश आहिर, पशूवैद्यकीय डॉ.संदीप टोंगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.