कॅब मुद्द्यावरून भाजपा शिवसेनेशी तडजोडीला तयार

0

नाशिक: केंद्रात ‘नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर कॉंग्रेसने शिवसेनेवर दबाव टाकत राज्यात हा कायदा लागू न करण्याचे सांगितले आहे. या मुळे शिवसेनेसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. कॅब हा कायदा देशासाठी आवश्यक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाला बळी न पडता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात या कायद्याची अंमलबजावणी करावी. त्यावरून काही पेचप्रसंग निर्माण झाल्यास सरकार वाचवण्यासाठी भाजप शिवसेनेशी तडजोड करण्यास तयार आहे,’ अशी खुली ऑफरच आमदार आशिष शेलार यांनी आज शिवसेनेला दिली.
नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारनं आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी नुकतीच मंजुरी दिली. मात्र, हा कायदा महाराष्ट्रात लागू होणार की नाही, यावरून संभ्रम आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनं या कायद्याच्या अंमलबजावणीला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यामुळं हिंदुत्ववादी विचारांच्या सेनेची कोंडी झाली आहे. हीच संधी साधत भाजपनं शिवसेनेला ऑफर दिली आहे. ‘महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचं सरकार आहे. हे सरकार वाचविण्यासाठी शिवसेनेनं देशहिताकडं दुर्लक्ष करू नये. शिवसेनेनं कोणालाही न घाबरता आपला मूळ बाणा दाखवावा,’ असं शेलार म्हणाले. ‘सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा कधीच हेतू नव्हता. घुसखोरांना घालवलंच पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळंच आम्ही शिवसेनेशी तडजोडीला तयार आहोत, असं ते म्हणाले.

दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसनं आयोजित केलेल्या ‘भारत बचाव’ रॅलीची शेलार यांनी खिल्ली उडवली. ‘या आंदोलनाचं नाव ‘भारत बचाव’ असं असलं तरी हेतू वेगळा आहे. भारतात घुसलेल्या पाकिस्तानी व अफगाणिस्तानी घुसखोरांना वाचवा, हीच काँग्रेसची भूमिका आहे. ‘भारत बचाव’ केवळ नौटंकी आहे,’ असा टोला त्यांनी हाणला.