केळी वाहतुक करणाऱ्या वाहनांना सायंकाळी 7 वाजेनंतरही इंधन मिळणार

0

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
जळगाव जिल्ह्यात सध्या केळीचा हंगाम सुरु आहे. जिल्ह्याच्या रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर व इतर भागातून मोठ्या प्रमाणात परराज्यात केळी पाठविण्यात येते. त्यांना इंधनाची अडचण येवू नये. याकरीता अशा वाहनांना पेट्रोलपंप चालकांनी सांयकाळी 7 वाजेनंतरही इंधन उपलब्ध करुन द्यावे. अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्या.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांची जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटोडे, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, पोलीस उप अधिक्षक दिलीप पाटील, महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात सध्या इतर जिल्ह्यातून पायी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. अशा नागरिकांची एकाच ठिकाणी गर्दी होवू नये याकरीता त्यांना एकाच ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात यावे. त्यांना चहा, पिण्याचे पाणी, नाश्ता, जेवण व आंघोळीची व्यवस्था करावी. अशा नागरिकांची संख्या अमळनेर, मुक्ताईनगर व चाळीसगाव तालुक्यात मोठ्या संख्येने असल्याने याची संबंधित नोडल अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.
जिल्ह्यातील काही खाजगी डॉक्टर ओपीडी करत नसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. याबाबत आयमाला पत्र द्यावे तसेच नर्सिग स्टॉफ कामावर येत नसल्याने तसे नर्सिंग फेडरेशनला कळवावे. त्याचबरोबर निमालाही कळविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.
शहरी व ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर वितरणाच्या वेळा ठरविण्यात आल्या आहेत. त्यानुसार ग्रामीण भागात सर्वांना पेट्रोल देण्याचे तर शहरी भागात अत्यावश्यक सेवांनाच पेट्रोल वितरण करण्याचे आदेश आहे. असे असूनही काही ठिकाणी नागरीकांची अडवणूक केली जात आहे. तर शहरी भागात अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली काही नागरिक पेट्रोल मिळण्यासाठी आग्रही असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची दक्षता पुरवठा विभागाने घ्यावी.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी डॉक्टरांना सेवा करण्याची इच्छा असल्यास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व जिल्हा रुग्णालयात आपली सेवा देता येईल. शहरात अनेक भागात सकाळी व संध्याकाळी नागरिक फिरण्यास जातात. अशा नागरिकांनी मुख्य रस्त्यांवर एकत्रित फिरु नये. सध्या अनेक भागात अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्यामार्फत सर्व्हेक्षण सुरु आहे. सर्व्हेक्षण करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाने मास्क व सॅनेटायझर पुरविण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असून एका संशयिताचा मृत्यु झाला आहे. याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करुन घराबाहेर पडू नये. आपली व कुटूंबाची काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे.