कैद्यांना घेवून जाणारे पोलिसांचे वाहन उलटले

0

धरणगाव रस्त्यावर बोध चावलखेडा फाट्याजवळ अपघात : कैदी पोलिसांसह 13 जण जखमी


जळगाव: जळगाव कारागृहातून सात बंदीवानांना अमळनेर न्यायालयात हजर करण्यासाठी घेवून जाणारे पोलिसांचे शासकीय वाहन खराब रस्त्यामुळे रस्त्याच्या कडेला उलटलयाची घटना शनिवारी दुपारी सव्वादोन ते अडीच वाजेच्या सुमारास धरणगाव रस्त्यावर बोध चावलखेडा फाट्याजवळ घडली. या अपघातात वाहनातील सात बंदीवान तसेच बंदोबस्तावर असलेले सहा पोलीस असे एकूण तेरा जणांना दुखापत झाली. खराब रस्त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

खराब रस्त्यांमुळे उलटले वाहन

कारागृहातील बंदीवान युनुसखान उस्मानखान, किशोर गोपीचंद पाटील, समाधान विलास पाटील, महेंद्र राजेंद्र कोळी, सागर राजेंद्र कोळी, राजेंद्र खंडू सोनवणे तसेच चंद्रकांत सुुभाष सपकाळे यांची शनिवारी अमळनेर न्यायालयात तारीख होती. या बंदींना न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस मुख्यालयातील सहा कर्मचार्‍यांची ड्युटी लावण्यात आली. त्यानुसार शनिवारी या सर्व बंदीना पोलीस वाहनातून एएसआय प्रभाकर बागुल , पोलीस कॉन्सटेबल निंबा भदाणे, पोलीस कॉन्सटेबल पंकज वराडे, पोलीस कॉन्सटेबल संतोष जाधव, पोलीस कॉन्सटेबल किरण पाटील तसेच कॉन्सटेबल पवन कृष्णा पाटील या कर्मचार्‍यांच्या बंदोबस्तात नेण्यात येत होते. यादरम्यान पिंप्री गावापुढे वळण घेतल्यानंतर वाहन रस्त्यालगत पलटी झाले.

पोलीस अधीक्षकांना दिली अपघाताची माहिती

घटनेची माहिती कळताच जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल, सहायक पोलीस निरीक्षक पी.पी. देसले तसेच सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्यासह कर्मचार्‍यांनी रूग्णालयात धाव घेतली. बंदीच्या तसेच कर्मचार्‍यांच्या प्रकृतीबददल त्यांनी माहिती घेतली. जखमींची नावे घेऊन कोणाला कुठे दुखापत झाली याची इत्यंभूत माहिती कर्मचार्‍यांनी घेतली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक देसले यांनी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना घटनेची तसेच जखमी बंदीवान तसेच जखमी कर्मचार्‍यांची माहिती दिली.

जि.प.सदस्यांसह नागरिकांकडून मदतकार्य

या मार्गावरून जाताना बसमधील एका प्रवाश्याने ही घटना बघीतली. त्यानंतर त्याच्याजवळ असलेल्या चालकाशी त्याने संपर्क करून रूग्णवाहिका पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार जि.प.सदस्य गोपाळ चौधरी यांच्या व्हॅनवरील चालक बंडू पाटील याने रूग्णवाहिका याठिकाणी आणली. बंदी तसेच पोलिसांना बसवून त्यांनी तत्काळ जिल्हा रूग्णालयात हलविले. बंदीवान समाधान पाटील याच्या छातीला तर पोलीस कॉन्सटेबल पवन पाटील याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अन्य बंदी तसेच कर्मचार्‍यांना हातापायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले.