कैर्‍या तोडल्याचा राग ; अपहरणानंतर बालकाचा केला खून

0 1

पिंपळाबारीची घटना ; दरीत फेकला मृतदेह ; एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा

धडगाव : कैर्‍या तोडल्याचा राग आल्याने आधी बालकाचे अपहरण करून नंतर त्याला गळफास देत खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पिंपळाबारी माथेपाडा येथे घडली. खुनाच्या तब्बल चार दिवसानतर ही घटना उघडकीस आली. या घटनेत अजय रमेश ठाकरे (12) या बालकाचा खून करण्यात आला तर या प्रकरणी आरोपी कुंदन निज्या वळवी याच्याविरुद्ध धडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आधी अपहरण नंतर केला खून
पिंपळाबारीचा माथेपाडा येथील रमेश जाण्या ठाकरे यांचा मुलगा अजयने गाव शिवारातीलच कुंदन निज्या वळवी यांच्या शेतातील झाडावरील कैर्‍या तोडल्याने आरोपी कुंदनने अल्पवयीन बालकाचे 7 रोजी अपहरण करीत त्याला झाडाच्या सालने गळफास देत खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पिंपळाबारी जंगलातील पातारी डोंगरावरील दरीत फेकून देण्यात आला. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र शुक्रवारी हा खून असल्याचे निष्पन्न झाले. तपास पोलीस निरीक्षक एस.बी.भामरे करीत आहे.