Wednesday , December 19 2018
Breaking News

कोरेगाव-भीमा हिंसाचार : गुन्हे मागे घेणार

9 कोटी 45 लाखांची भरपाई देणार
मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी राज्य सरकार 9 कोटी 45 लाखांची नुकसान भरपाई दोणार आहे. या प्रकरणात एकूण 58 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 162 जण अटकेत आहेत. दंगलीत पोलिस कर्मचारी व अधिकारी जखमी झाले होते. तर एका तरूणाचा मृत्यू झाला होता. 9 कोटी 45 लाखांची नुकसान झाल होते. ही नुकसान भरपाई राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतला आहे. तर 3 जानेवारीच्या बंदमध्ये तीन कोटींचे नुकसान झाले होते. 1199 जणांना अटक करण्यात आली होती. 2054 प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. बंददरम्यान ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते, त्यांच्यावरीलही गुन्हे राज्य सरकार मागे घेणार आहे. गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठीची प्रक्रिया करण्यासाठी अतिरिक्त महासंचालकांची समिती नेमण्यात येणार असून, ही समिती तीन महिन्यात अहवाल देईल. मात्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍यांवरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेतील चर्चेला उत्तर देताना मंंगळवारी दिली.

प्रशासनाने पूर्वतयारी केली होती
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे उसळलेली दंगल आणि त्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंदबाबत विधानपरिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणातील गुन्हे मागे घेणार असल्याचे व नुकसान भरपाई देणार असल्याचे सभागृहात सांगितले. सुरक्षेसंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, भीमा कोरेगाव विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी हजारो लोक दरवर्षी येतात. यंदा 200वे वर्षे असल्याने मोठी गर्दी होणार हे ध्यानात घेत सरकारने पूर्वतयारी केली होती. आजूबाजूचे अतिक्रमण हटविले होते. 10 एकर परिसराला अतिक्रमणमुक्त करून संरक्षक भिंत उभारण्याचे कामाला निधी उपलब्ध करून दिला. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी पालकमंत्री, सामाजिक न्यायमंत्री आदल्या दिवशी भेटी दिल्या होत्या. येणार्‍या गर्दीच्या सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. तीन चार महिन्यांपासूनच व्यवस्था सुरू केल्या होत्या.

भगवे झेंडेधारींनी दंगल घडवून आणली
31 तारखेला सायंकाळी सुरक्षा व्यवस्थेची रंगीत तालिमही घेण्यात आली. 31 डिसेंबरच्या रात्री 11 ते 11.30 वाजेदरम्यान ग्रामपंचायत भीमा कोरेगावने पोलिस स्टेशनमध्ये सुरक्षा व्यवस्थेच्या कारणाने बंदचे पत्र दिले होते. एक तारखेला सकाळी 11 ते 12 वाजेदरम्यान भगवे झेंडेधारी संभाजी महाराजांच्या समाधीवर मानवंदनेसाठी जमले होते. रोज साधारण शंभर दोनशेच लोक असतात. पोलिसांनी तात्काळ त्यांना रोखून मानवंदनेनंतर परत जायला सांगितले. त्यातले शंभर दोनशे मोटारबाईकवरील लोक वळसा घालून रस्त्यावर रिंगण घालू लागले, घोषणाबाजी करत होते. त्यानंतर दोन्ही बाजूने दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना वेगळे केले. नंतर या टोळक्याने वाहतळांना लक्ष्य केले. तिथून पिटाळून लावल्यानंतर सणसवाडीत दगडफेकीच्या घटना घडल्या, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.

बंदोबस्तामुळे मोठी दुर्घटना टळली
विजयस्तंभावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक मिनिटही मानवंदना थांबली नाही. एक ते दोन तासात हा घटनाक्रम झाला. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, अफवांचे पीक मोठ्या प्रमाणावर आले होते. पण, सुदैवाने मोठ्या पोलिस बंदोबस्तामुळे मोठी दुर्घटना टळली. एसटी व पीएमटी बसेची व्यवस्था करून भाविकांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी पोहोचविण्यात आले होते. भीमा कोरेगाव घटनाप्रकरणी सरकार व्यक्ती, जाती, धर्मनिरपेक्ष भूमिकेतूनच कारवाई करत आहे. सरकार आपला राजधर्म पाळत आहे, असेही फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडे यांच्याबाबत वक्तव्य केले नाही. परंतु, मिलिंद एकबोटे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला, ते पसार झाल्यावर कोम्बिंग ऑपरेशन केल्याचे त्यांनी सांगितले.

About admin

हे देखील वाचा

मी पाकिस्तानी गायक असतो तर बरं झालं असतं – सोनू निगम

मुंबई : प्रेक्षकांना आपल्या आवाजानं मोहित करणार गायक सोनू निगमवर आता स्वत:ला पाकिस्तानी गायक म्हणवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!