कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चितोडा गावाच्या सीमा बंद

0

चितोडा, ता.यावल : येथील ग्रामपंचायतीने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारवर बांबू आणि काटेरी झाडे टाकून गावची सीमा बंद केली आहेत. त्यामुळे आता गावामध्ये बाहेरील व्यक्तींना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. यावेळी माजी सरपंच कडू पाटील, सलीम तडवी, माजी उपसरपंच मनोज पाटील, ग्रा.पं.सदस्य दिनेश धांडे, मनोज पाटील, अनिल तडवी, दिनेश कुरकुरे, गोकुळ पाटील, मनोज भंगाळे, रितेश धांडे आदींनी रस्त्यात काटे, लाकडं टाकून रस्ता बंद केला.

सध्या देशात कोरोनाने भयावह रूप धारण केले आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्रात आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने महत्वाची पावले उचलली असून संपुर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. शासनाकडून नागरिकांना घरातून बाहेर न येण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. मात्र काही नागरिकांना अद्यापही याचे गांभीर्य नसल्याने काही बाहेरून आलेले फेरीवाल्यांसह इतर व्यक्ती एका गावातून दुसऱ्या गावात फिरत आहेत. चितोडा गावातही अशा व्यक्ती खुलेआम फिरताना आढळल्याने ग्रामपंचायतच्या वतीने गावची सीमा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी ग्रामपंचायातच्या वतीने ज्या ठिकाणी सीमा बंद केली आहेत त्याठिकाणी १ स्वयंसेवक ठेवण्यात आला आहेत. दरम्यान, आवश्यकता नसल्यास गावातील नागरिकांनीही बाहेर पडू नये असे आवाहन ग्रामपंचायतकडून करण्यात आलं आहे.