कोरोनापासून बचावासाठी दारु, तंबाखूपासून दूर रहा – आरोग्य मंत्रालय

0

नवी दिल्ली – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात सध्या लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला घरातच राहण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, हे तुमच्या सुरक्षेसाठी असून या काळात तंबाखू आणि दारुचे सेवनही करु नका, कारण ते तुम्हाला दिलासा देण्याऐवजी तुमची प्रकृती बिघडवू शकते. यामुळे तुमची प्रतिकारक्षक्ती कमी होण्याचा धोका आहे, अशा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

सरकारने एक पुस्तिका ऑनलाइन प्रसिद्ध केली आहे, यामध्ये काही टिप्स देण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टंसिंगमुळे चिंता आणि ताण निर्माण झाल्यास त्यावर कशी मात करावी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. नकारात्मक भावनांपासून स्वतःला दूर ठेवा. यासाठी आवडतं संगीत ऐका, पुस्तकं वाचा, टिव्हीवर मनोरंजनाचे कार्यक्रम बघा. त्याचबरोबर पेंटिग्ज बनवणे, बागकाम करणे किंवा कपडे शिवणे असे तुमचे जुने छंद असतील तर पुन्हा ते सुरु करा. याद्वारे मागे पडलेल्या तुमच्या छंदांचा पुन्हा एकदा शोध घ्या, असे सल्ले या पुस्तिकेमध्ये देण्यात आले आहेत. आयसोलेशनमध्ये असताना एकटं वाटणं किंवा वाईट वाटणं ही सामान्य बाब आहे. या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून कुटुंब आणि मित्र परिवारासोबत कनेक्टेड रहा. बर्‍याच काळापासून ज्यांच्याशी तुमचा संवाद झालेला नाही त्यांना फोन करुन आश्चर्याचा धक्का द्या. अशा प्रकारे संवाद साधताना आपले आनंदी क्षण, सामायिक आवडीच्या गोष्टी, जेवण बनवण्याच्या टिप्स किंवा संगीताचं आदान-प्रदान करा, असेही यात म्हटले आहे. जर तुम्हाला एकटं वाटत असताना खूपच नकोसं वाटत असेल काहीवेळा हे जीवनच नको अशी भावना मनात उत्पन्न होत असेल तर तुमच्या फॅमिली डॉक्टरांना, मानसोपचार तज्ज्ञांना किंवा (०८०-४६११०००७) या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा आणि सल्ला घ्या, असे आवाहन आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे.