कोरोनापासून बचावासाठी शहाद्यात नगरसेवकांकडून जनजागृती

0

शहादाः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी नागरिकांनी तोंडाला मास्क लावण्या संदर्भात जनजागृती केली. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घरात थांबणे हाच एक चांगला उपाय असून बाहेर पडतांना तोंडावर मास्क अथवा रुमाल लावणे आवश्यक आहे परंतु अनेक जण मास्क लावणे टाळत आहेत.शासन आणि प्रशासन उपाय योजना करीत मास्क लावण्यासंदर्भात आवाहन करण्यात येत आहे.तेवढ्या पूरते आवाहनाला प्रतिसाद मिळतो पून्हा जैसे थे.हे सर्व आपल्या स्वास्थ्यासाठी सांगितले जात आहे याचे भानच हरपले आहे.
शहरात संचारबंदी लागू असून सकाळी ८ ते १२ वाजे दरम्यान नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी आणि विकण्यासाठी मोकळीकता देण्यात आली आहे.परंतु जीवनावश्यक वस्तू घेतांना सामाजिक अंतर तसेच तोंडाला मास्क लावणे गरजेचे असतांना अनेक जण अशा उपाययोजनेला हरताळ फासत आहे त्यामुळे शासनाने केलेल्या संचारबंदीचा उद्देश अयशस्वी होवू शकतो एवढे भान नसल्याने अशा नागरिकांना आवाहन करीत मास्क लावण्याची विनंती करण्याचा पवित्रा येथील नगरसेवक संदीप पाटील,सामाजिक कार्यकर्ते अजित बाफणा,संतोष वाल्हे,पिनाकीन पटेल यांनी घेतला.
दोंडाईचा रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला तोंडाला मास्क लावा,रुमाल बांधा असे आवाहन वरील व्यक्तींनी करीत कोरोना संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या आवाहनाला अनेकांनी साद दिली.कोरोना व्हायरस संदर्भात शहरातील अनेक सामाजिक ,राजकीय जनजागृती करीत मदतीचा हात देत आहेत.