कोरोनाला दुसर्‍या टप्प्यातच रोखा

0

अनंत बोरसे, शहापूर

मनुष्य जन्म एकदाच मिळतो यावर आपण सगळेच विश्वास ठेवतो आणि त्याचे मोल काय आहे? हे मरण डोळ्यासमोर उभे राहिल्यावर कळते. आता पृथ्वीतलावरील समस्त मानव जातीच्या बाबतीत तेच दिसत आहे. संपूर्ण जगाला जीवघेण्या आणि चीनची देण असलेल्या कोरोनाने मोठ्या चिंतेत टाकले आहे. या संकटाला ना कुठल्या देशाच्या सीमा अटकाव करू शकल्या ना याने कुठल्या जाती, धर्म, पंथ, गरीब – श्रीमंत यांच्यामध्ये भेदभाव केला आहे. 2019 या वर्षाने शेवटाला निरोप घेत असताना कोरोनाच्या रुपाने मोठेच जागतिक संकट उभे करून निरोप घेतला. सुरुवातीला चीनपुरता मर्यादित असलेले हे संकट संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेऊ पाहात आहे. अजूनपर्यंत यावर इलाज सापडला नसल्याने सगळ्यांचीच धाकधूक दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांची शक्यता 2 ते 3 टक्के इतकीच आहे. 10 मार्च रोजी, हे संकट भारतात येऊन धडकले. दुबई येथून आलेल्या जोडप्यांपैकी एकाला कोरोनाची लागण झाली आणि आजच्या तारखेला कोरोनाने देशाला मोठ्या संकटात टाकल्याचे दिसत आहे. वास्तविक दोन महिन्यांपासून कोरोना जगात थैमान घालत असतांना देशातील सर्वच विमानतळांवर येणार्‍यांची कसून आरोग्य तपासणी झाली असती तर कदाचित संकटाचा तिथेच अटकाव झाला असता. आज सर्वत्र चिंता आहे ती हे संकट कसे परतवून लावायचे? जगभरात 1.97 लाख लोकांना तर देशात आजपर्यंत 150 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जगभरात 7,830 जण मृत्युमुखी पडले आहेत. राज्यातील 12 कोटी जनतेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. विद्येचे माहेरघर आणि आयटी शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे. राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, पण दुर्दैवाने अजूनही जनतेमध्ये म्हणावे तेवढे गांभीर्य आणि जागरूकता दिसत नाही. विशेषतः राज्यातील ग्रामीण भागात. सध्या सोशल मीडियातून याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत आहे, पण सोशल प्लॅटफॉर्मचा वापर करून अनेक समज-गैरसमज पसरविले जात आहेत. त्यावर सरकारने गांभीर्याने नियंत्रण आणणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे स्वच्छता आणि गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाकडून वारंवार देण्यात येणार्‍या सूचनांचे गांभीर्याने पालन हे व्हायला हवे. जास्त पॅनिक न होता, धैर्याने आपणा सर्वांनाच या संकटावर मात करायची आहे. मला काही झाले नाही म्हणून निष्काळजीपणा करणे सर्वांसाठी धोक्याचे ठरू शकते हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

कारोनासारख्या जागतिक महामारीने जगाला हादरवून सोडले आहे. महाराष्ट्रात परिस्थिती अद्यापही हाताबाहेर गेलेली नाही याचे श्रेय राज्य सरकार, आरोग्य विभाग व संबंधित यंत्रणांचे आहे. काही नतद्रष्ट या संधीचा फायदा उचलून जनतेची दिशाभूल आणि आर्थिक लूट करीत आहेत हे खरोखरच चिड आणणारे आहे. सगळीकडे संचारबंदीसारखे वातावरण बनले आहे. कधी नव्हे ती अभूतपूर्व परिस्थिती सर्वांसमोर उभी ठाकली आहे. अगोदरच महागाई, बेरोजगारी, आर्थिक संकटाचे मोठे आव्हान देशासमोर उभे ठाकले असतांना कोरोनाने तर सर्वाधिक चिंता वाढविली आहे. पुढील पंधरा दिवस हे सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. या संकटाला दुसर्‍या टप्प्यातच रोखायची तुमची-आमची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडायची आहे. येणारा काळ सगळ्यांचीच कसोटी पाहणारा आहे. त्याच बरोबर पुढील काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. –