कोरोना : जिल्ह्यात 19 संशयित निगेटिव्ह

0

अहवाल प्राप्त; एकूण 28 रुग्णांची तपासणी ः सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोरोनाची चाचणीसाठी नमुने घेण्याची व्यवस्था

जळगाव: जिल्हाभरात कोरोना’ची चाचणी करण्यासाठी व नमुने घेण्यासाठी संशयिताला जिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागत होते. परंतु, शासनाने आता प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात कोरोनाचे नमुने घेण्याची व्यवस्था केली आहे. दरम्यान, विदेशातून आलेले कोरोनाचे पाच संशयित रुग्णालयात दाखल झाले असून, आतापर्यंतचा संशयितांचा आकडा हा 28 वर पोहोचला आहे. जिल्हाभरातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोरोनाची चाचणी करण्यासाठी लागणारे नमुने घेण्याची व्यवस्था करण्यात आली असून तशा सुचना देण्यात आले असल्याचे डॉ. भास्कर खैरे यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयात नवीन पाच रुग्ण दाख

संपूर्ण देशभरात कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले असून, त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. जिल्ह्यात देखील कोरोनाच्या संशयितांची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढतच आहे. आज जिल्ह्यातील 4 पुरुष व एक महिला असे एकूण पाच संशयित रुग्णालयात दाखल झाले आहे. यात जळगाव येथील 38 वर्षीय तरुण दुबई येथून 21 मार्चला शहरात आला होता. त्याला घशात त्रास होत आहे. दुसरा 24 वर्षीय संशयित हा अरब अमिरातीतून 13 मार्चला आला असून, त्याला सर्दी, खोकला व तापाची लक्षणे आढळून आली आहेत. फैजपूर येथील तिसरा 32 वर्षीय तरुण थायलंड येथून 5 मार्चला आला असून, त्याला घशात त्रास होत आहे. तसेच 54 वर्षीय महिला ही 15 मार्चला दुबई येथून आली असून, त्या महिलेला ताप व सर्दी खोकल्याचा त्रास होत आहे. पाचवा संशयित 29 वर्षीय एरंडोल येथील व्यक्ती मुंबई येथील आहे. या सर्वांच्या थुंकीचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील चोपडा, जामनेर, मुक्ताईनगर, चाळीसगाव, भुसावळ, पारोळा, एरंडोल, भडगाव, अमळगाव, रावेर, न्हावी, पाल, यावल यासह जिल्हाभरातील सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोरोनाची चाचणी करण्यासाठी लागणारे नमुने घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णांमध्ये तपासणीनंतर तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांना आवश्यकता वाटल्यास जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी यावे, अन्यथा येवू नये असेही आवाहन डॉ. भास्कर खैरे यांनी केले आहे.

रशियातून परतलेल्या रुग्णाची चौकशी

रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रशियातून एक तरुण तीन दिवसापासून घरी दाखल झाला आहे. याबाबतची माहिती कुटुंबियांनी लपवून ठेवल्याचे समजताच पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी सोमवारी दुपारी त्याचे घर गाठले. हा तरुण रशिया येथून दिल्ली येथे आला व तेथून तो जळगावात आला. दिल्ली विमानतळावर त्याची कोरोनाची तपासणी झाली आहे. त्याला लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबतचे कागदपत्रे या तरुणाने पोलिसांकडे सादर केली. तपासणीचा शिक्काही त्याच्या हातावर मारण्यात आला होता. तरीही खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्याच्या सूचना निरीक्षक बडगुजर यांनी या तरुणाला दिल्या आहेत. तो 14 दिवस यंत्रणेच्या निगराणीखाली राहणार आहे. परदेशातून आल्यानंतर या तरुणाने पोलिसांना कळविणे अपेक्षित होते, मात्र त्याने न कळविल्याने ही माहिती पोलिसांपर्यंत पोहचली.

हे तीन लक्षणे असतील तरच कोरोनाची तपासणी

राज्य आरोग्य विभागाने कोरोनाबाबत नियमावली आखून दिली आहे. यामध्ये जी व्यक्ती विदेशातून प्रवास करून आलेली आहे, कोरोनाग्रस्ताच्यासंपर्कात आलेली व्यक्ती, एआरडी (ऍक्युरेट रेस्पिरेटरी डिस्प्लेट) म्हणजेच श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होणार्‍या व्यक्ती. ही तीन लक्षणे असणार्‍या व्यक्तींचीच कोरोनाची चाचणी होणार असून, त्यांचेच नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली.

19 जणांचे अहवाल निगेटिव्ह’

जिल्हाभरातून आतापर्यंत 28 कोरोनाचे संशयित दाखल झाले आहे. यामध्ये आज पाच नवे संशयित दाखल झाले आहे. यातील 19 संशयित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, 2 जणांचा अहवाल रिजेक्ट करण्यात आला आहे. तसेच 7 संशयित रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत असून जिल्हा कोरोना कक्षात सद्य:स्थितीत 7 जणांवर उपचार
सुरू आहेत.