कोरोना : रेल्वे गाड्या रद्द : स्वच्छतेला प्राधान्य

0

यावलसह वरणगावात स्वच्छता, जंतूनाशक फवारणी : रावेर निरीक्षकांसह भुसावळ मुख्याधिकार्‍यांनी केले रविवारी घरीच थांबण्याचे आवाहन

भुसावळ : जगभरात धुमाकूळ घालणार्‍या कोरोनामुळे देशात पाच जणांचे बळी गेल्यानंतर प्रशासनाने नागरीकांना गर्दीचे कार्यक्रमात जाणे टाळण्यासह शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. रेल्वे प्रशासनानेही गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफार्म तिकीट वाढवले असून गेल्या तीन तीन दिवसांपासून सातत्याने रेल्वे गाड्या रद्द करण्यास प्रारंभ केला असून शुक्रवारीदेखील पुन्हा आठ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यावलसह वरणगाव पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यासह जंतूनाशकांची फवारणी सुरू केली आहे तर भुसावळ पालिकेतर्फे लवकरच शहरात स्वच्छता व फवारणी केली जाणार आहे. दरम्यान, रविवार, 22 रोजी ‘जनता कर्फ्यू’ असल्याने नागरीकांनी शनिवारी आवश्यक ती खरेदी करून रविवारी दिवसभर घरातच थांबावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

भुसावळ पालिका राबवणार स्वच्छता मोहिम
भुसावळ पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे म्हणाल्या की, शहरात लवकरच पालिका प्रशासनातर्फे स्वच्छतेचा ड्राईव्ह घेण्यात येणार असून स्वच्छता मोहिम राबवून जंतूनाशकाची फवारणी केली जाणार आहे. शहरातील स्वच्छतेच्या प्रश्‍नावर आपण वैयक्तिक लक्ष ठेवून असून खडका रोड परीसरातील कचरा मोठ्या प्रमाणावर नुकताच उचलण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. भुसावळ पालिकेतील 312 स्वच्छता कर्मचारी कुठल्याही साहित्याविना स्वच्छता करीत असल्याच्या बाबीवर त्यांचे लक्ष वेधल्यानंतर डहाळे यांनी सांगितले की, स्वच्छता कर्मचार्‍यांना डेटॉल साबण, मास्क तसेच हॅण्डग्लोजचा लवकरच पुरवठा करण्यात येणार आहे. दरम्यान, रविवार, 22 रोजी शहरवासीयांनी स्वयंस्फूर्तीने एका दिवसासाठी ‘जनता कर्फ्यू’ पाळून सकाळी सात ते नऊ दरम्यान घरात थांबावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

रेल्वे प्रशासन अलर्ट : बुकींग कार्यालयाबाहेर मारल्या लाल रेषा
भुसावळ-
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्वोतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. रेल्वे तिकीट बुकींग कार्यालयाबाहेर प्रवाशांमध्ये अंतर राखण्यासाठी लाल रंगाच्या रेषा मारण्यात आल्या आहेत. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी ओसरल्याची चित्र आहे. अनेक प्रवाशांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आपले नियोजित प्रवास रद्द केल्याने रेल्वेलादेखील मोठा आर्थिक फटका बसला आहे.

भुसावळातील ‘त्या’ डॉक्टरांचा शहरवासीयांना धसका
भुसावळ-
शहरातील रहिवासी एमबीबीएस शिक्षण झालेल्या तरुण डॉक्टराची प्रकृती खालावल्याने त्यास गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते शिवाय या डॉक्टरकडे कोरोना संशयीत म्हणून पाहिले जात असल्याने भुसावळकरांमध्ये प्रचंड भीती पसरली होती. कोल्हापूर येथे वैद्यकीय अधिकारीपदासाठी अर्ज करण्यासाठी गेलेला हा तरुण डॉक्टर दोन दिवस मित्रांच्या खोलीवर राहिल्यानंतर ट्रेनने भुसावळात आल्यानंतर त्याची प्रकृती खालावल्याने त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र त्याची प्रकृती अत्यंत खालावल्याने त्यास व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आल्यानंतर त्यास मुंबईत हलवण्यात आल्याची माहिती आहे. वैद्यकीय रीपोर्ट आल्यानंतरच या डॉक्टरास कोरोना आहे वा नाही? ही बाब निष्पन्न होणार असलीतरी या प्रकारामुळे भुसावळकरांमध्ये चांगलीच भीती पसरली आहे.

मुंबई-पुणेकरांनी पसरवली अधिक भीती
कोरोनामुळे पुण्यासह मुंबई स्लो डाऊनमुळे कामगारांसह कर्मचार्‍यांना सुट्या देण्यात आल्याने अनेक जण गावाकडे परतत आहे त्यात भुसावळसह यावल व नजीकच्या तालुक्यातील नागरीकांचा समावेश आहे मात्र लक्झरी तसेच एस.टी.बसेस व अन्य साधनांनी परतणार्‍या नागरीकांची कुठलीही वैद्यकीय चाचणी होत नसल्याने एखाद्या कोरोना संशयीताच्या ते संपर्कात आले असल्यास अन्य नागरीकांना त्याचा फटका बसण्याची भीती असल्याने आरोग्य विभागाने ही बाब गांभीर्याने घेण्याची भीती आहे.