कोरोना विषाणू: जागतिक आरोग्य संघटनेकडून आरोग्य आणीबाणी घोषित !

0

वुहान: चीनमध्ये उगम पावलेल्या कोरोना विषाणूचा आता जगभरात वेगाने फैलाव होत आहे. भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. केरळमध्ये पहिला रुग्ण आढळला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. चीनमध्ये आतापर्यंत १० हजार जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून, २१३ जणांचा मृत्यू झाला आहे.
जागितक आरोग्य संघटनेला कमकुवत आरोग्य व्यवस्था असलेल्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची चिंता सतावत आहे. कोरोना विषाणूचा फैलाव चीनमधून झाला आहे. त्यामुळे चीनमध्ये या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. भारतामध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूचा फक्त एक रुग्ण आढळला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. आपण सर्व एकत्र आलो तरच कोरोनाला रोखणे शक्य आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टीड्रोस म्हणाले. कोरोना विषाणूचा फैलाव आतापर्यंत १५ देशांमध्ये झाला आहे. त्यामुळे चीनमध्ये प्रवास करण्यावर तसेच व्यापारावर निर्बंध आणून काहीही साध्य होणार नाही असे टीड्रोस यांनी सांगितले. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी चीनने वुहानसह काही शहरे पूर्णपणे बंद केली आहेत. वुहान हे कोरोना विषाणूच्या फैलावाचे मुख्य केंद्र आहे.