क्रिकेटमधील ऐतिहासिक दिवस

0

श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड, जि. पुणे

22 नोव्हेंबर हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण या दिवशी भारतीय क्रिकेटमध्ये नवा अध्याय सुरू होणार आहे. याच दिवशी भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर पहिला दिवसरात्र कसोटी सामना रंगणार आहे. 2015 साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दरम्यान पहिला दिवसरात्र कसोटी सामना खेळवण्यात आला तेव्हापासून आजवर अशा प्रकारचे 11 कसोटी सामने झाले आहेत. या सर्व सामन्यांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. भारत, बांगलादेश व अफगाणिस्तान वगळता सर्वच देश दिवसरात्र कसोटी सामने खेळले आहेत. भारताने दिवसरात्र कसोटी खेळावी, अशी भारतातील क्रिकेट रसिकांची ईच्छा होती पण बीसीसीआयच्या अडेलतट्टूपणामुळे ती पूर्ण होत नव्हती. 2018-19 च्या ऑस्ट्रेलियन दौर्‍याच्या वेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिवसरात्र कसोटी सामना खेळण्याची ऑफर बीसीसीआयला दिली होती पण बीसीसीआयने ती फेटाळून लावली होती. बांगलादेश आणि न्यूझीलंडकडूनही अशाप्रकारची आलेली ऑफर बीसीसीआयने फेटाळली होती. त्यावेळी गुलाबी चेंडूवर खेळण्याची तयारी नसल्याचे कारण सांगण्यात आले होते. ऑस्ट्रेलिया दरवर्षी दिवसरात्र कसोटीचे आयोजन करते. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा पूर्वीपासून या प्रकारच्या कसोटीचा पुरस्कर्ता आहे. त्याने बीसीसीआयचे सूत्रे हाती घेताच पहिला निर्णय घेतला तो दिवसरात्र कसोटी सामना खेळवण्याचा. कारण कसोटी क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. टी-20 च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कसोटी क्रिकेट मागे पडू लागले आहे.
नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळाला होता. मैदानावर प्रेक्षकांची उपस्थिती खूप कमी होती. इतकेच काय तर टीव्हीवर देखील कसोटी सामन्यांना म्हणावा तसा टीआरपी मिळाला नाही. कसोटी क्रिकेटची ही घटती लोकप्रियता चिंतेची बाब आहे. कसोटी क्रिकेटपासून दूर गेलेल्या या प्रेक्षकांना पुन्हा स्टेडियममध्ये खेचून आणून कसोटी क्रिकेट वाचवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी दिवसरात्र कसोटी हा चांगला पर्याय आहे. या सामन्यांमुळे प्रेक्षक पुन्हा कसोटीकडे वळतील आणि कसोटी क्रिकेटला पुन्हा अच्छे दिन येतील. कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन द्यायचे असेल तर जास्तीतजास्त दिवसरात्र कसोटी सामने व्हायला हवेत. हे सामने खेळताना काही अडचणी येतील, मुख्य अडचण असेल ती चेंडूची. दिवसरात्र कसोटी खेळताना गुलाबी चेंडूचा वापर केला जातो. गुलाबी चेंडूवर खेळण्याचा भारतीय खेळाडूंना जास्त अनुभव नाही. असे असले तरी देवधर करंडक स्पर्धेत झालेले सर्व सामने दिवसरात्र खेळवण्यात आले होते व त्यात गुलाबी चेंडूचाच वापर करण्यात आला होता. भारतीय संघातील सर्व खेळाडू हे व्यावसायिक आणि प्रचंड अनुभवी आहेत. त्यामुळे त्यांना गुलाबी चेंडूवर खेळताना कोणतीही अडचण येणार नाही. याआधीही क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले आहेत. दिवसा खेळवण्यात येत असलेले एकदिवसीय सामने दिवसरात्र होऊ लागले. लाल चेंडूची जागा पांढर्‍या चेंडूने घेतली तेव्हाही काहींनी शंका उपस्थित केल्या होत्याच. आज मात्र दिवसरात्र होणार्‍या एकदिवसीय सामन्यांना प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळतो. रात्री खेळल्या जाणार्‍या टी 20 सामन्यांची लोकप्रियता तर वादातीत आहे. केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर अनेक दिग्गज खेळाडूंनीही दिवसरात्र कसोटीचे स्वागत केले आहे. सचिन तेंडुलकर तर या कसोटीसाठी कमालीचा उत्सुक आहे.
22 नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या या दिवसरात्र कसोटीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार यात शंका नाही आणि तसे झाले तर भारतातच नव्हे तर इतर देशांतही दिवसरात्र कसोटी सामने मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातील त्यामुळे कसोटी क्रिकेटला संजीवनी मिळेल.