भुसावळात भंगार वेचणार्‍यावर चाकू हल्ला : आरोपीस सात वर्ष शिक्षा

0

भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निकाल : आरोपीस सुनावला पाच हजारांचा दंड

भुसावळ- रेल्वे स्थानकावर सोल्यूशन पीत असलेल्या भंगार वेचणार्‍यावर सोल्युशनच्या पैशांवर वाद करीत त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी संशयीत आरोपी अर्जुन उर्फ श्रावण घिसुलाल काजदेकर (बेडागढ, ता.धारणी, जि.अमरावती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऑगस्ट 2017 मध्ये भुसावळ प्लॅटफार्म क्रमांक सहावरील खंडवा एण्डला ही घटना घडली होती. या खटल्याचे भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात कामकाज चालल्यानंतर शुक्रवारी आरोपीस सात वर्ष सक्तमजुरी तसेच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस सश्रम कारावासाची शिक्षा न्या.एस.बी.भन्साली यांनी सुनावली.

पैशांच्या वादातून केला चाकूहल्ला
रोहितप्रसाद नर्मदाप्रसाद तिवारी (ललितपूर, जि.बीना, मध्यप्रदेश) हा सोल्यूशनचा नशा करीत असताना संशयीत आरोपी अर्जुन काजदेकर याने सोल्यूशनच्या पैशांवर तिवारी याच्याशी वाद घातल्यानंतर जवळच जेवण करीत असलेल्या शाहीन बेगम व प्रवीण सिसोदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी आरोपीने खिशातून चाकू काढत तिवारी याच्या पोटावर मारला होता. तिवारी यास तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर पोलिस नाईक दिनकर हरी कोळी यांनी आरोपीविरुद्ध तक्रार दिल्यावरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात फिर्यादीसह दहा साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक उज्ज्वल व्ही.पाटील यांनी केला तर पैरवी अधिकारी म्हणून हवालदार समीना तडवी तसेच केस वॉच म्हणून नाईक दुर्योधन शंकर तायडे यांनी काम पाहिले. आरोप सिद्ध झाल्याने आरोपीस सात वर्ष सक्तमजुरी तसेच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली. या खटल्यात सरकारतर्फे सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.विजय खडसे यांनी काम पाहिले.