अतिक्रमणच्या कर्मचार्‍यांना मारण्याचा प्रयत्न; पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल

0

शिवाजीनगरात कारवाईदरम्यान वाद; अतिक्रमीत शेड तोडले

जळगाव– शहरात गेल्या काही दिवसांपासून मनपा प्रशासनातर्फे अतिक्रमण निर्मुलनाची मोहीम सुरु आहे. गुरुवारी शिवाजीनगरामधील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी मनपाचे पथक गेले होते. कारवाईला विरोध करत काही अतिक्रमीतधारकांनी मनपाच्या पथकावर लोखंडी पाईपने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाद निर्माण होऊन गोंधळ उडाला होता. दरम्यान,उपायुक्त अजित मुठे यांनी तात्काळ धाव घेवून अतिक्रमण तोडण्यास सांगितले.तसेच संबंधितांविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान यांनी तक्रार दाखल केली असून उशीरापर्यंत पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरु होते.

जळगाव शहरातील रस्त्यावरील झालेले अतिक्रमण काढण्याची मोहिम महापालिकेने सुरू केलेली आहे. त्यानुसार ही मोहिम सुरू असून आज शिवाजीनगरातील लाकुडपेठ रस्त्यापासून ही कारवाई सुरू केली. दुपारी एकच्या सुमारास लाकुडपेठ येथीलच एका इमारतीला लागून असलेले शेड थेट पाच ते सहा फुट रस्त्यात येत होते. याबाबत मालमत्ताधारकाला महापालिकेने शेड काढून घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतूू मालमत्ताधारकाने शेड न काढता आज कारवाई प्रसंगी अतिक्रमण निर्मूलन पथकाला शेड काढण्यास विरोध केला. यावेळी शाब्दीक चकामक होवून थेट मालमत्ताधारकाने पथकातील कर्मचार्‍यांवर लोखंडी पाईप काढून मारण्याचा धमकी दिली.

अतिक्रमीत शेड तोडले

शिवाजीनगरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. त्यानुसार महाबळ रस्त्यावरील बुधवारी अतिक्रमण कारवाई केल्यानंतर आज शिवाजीनगरात सकाळी अकरा वाजता अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाचे पथक कारवाईसाठी शिवाजीनगरात गेले. कानळदा रस्ता, लाकुड पेठ, अमर चौक, क्रांती चौक, श्री मोर्टस पर्यतचे सुमारे 8 मोठे शेडचे अतिक्रमण सायंकाळी पाच पर्यंत काढण्यात आले.

पाच ते दहा फुटापर्यंत अतिक्रमण

शिवाजीनगरच्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण कारवाई प्रसंगी सुमारे पाच ते दहा फुटापर्यतचे रस्त्यात अतिक्रमण झाल्याचे आढळून आले. एक घर चक्क आठ फुटापर्यंत अतिक्रमण करण्यात आले असल्याचे दिसून आले.