खुबचंद साहित्यावर हल्ला; दोन संशयित पोलिसांना शरण

0

मुंबईहून उपचाराचे कागदपत्रे मागविले

जळगाव : बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात माजी महापौर ललीत कोल्हे यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यातही ललीत कोल्हेंसह सहा जण निष्पन्न झाले होते. यातील राकेश चंदू आगरिया (22, रा.वाघ नगर, जळगाव) व निलेश नंदू पाटील (24, रा.कोल्हे नगर, मुळ रा.फागणे, ता. धुळे) हे दोघ जण मंगळवारी पोलिसांना शरण आले. दोघांना बुधवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

10 ते 12 जणांचे नोंदविले जबाब

या गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी राजू आडवाणी, राष्टवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह दहा ते बार जणांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यांच्यापैकी काही जणांचेही पोलिसांनी जबाब नोंदविले आहे. यात घटनेच्या दिवशी प्रत्यक्षदर्शी हजर असलेल्या काहींचा समावेश आहे. तर काही जण प्रत्यक्षदर्शी असतांनाही चौकशी दरम्यान घटनेवेळी हजर नसल्याचे सांगत घटनाक्रम सांगण्यास किंवा जे डोळ्यांनी पाहिले जबाब नोंदविण्यास तयार नसल्याचा अनुभव शहर पोलिसांना आला आहेत.

उपचारासाठी कागदपत्रांसाठी पोलीस मुंबईत

नवी पेठेतील गोरजाबाई जिमखान्यात खुबचंद साहित्या यांच्यावर 16 रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर साहित्या यांच्यावर शहरात प्राथमिक उपचार करुन दुसर्‍या दिवशी त्यांना मुंबईला हलविण्यात आले. तेथे तसेच शहरात त्यांच्यावर काय उपचार करण्यात आले. कोणत्या चाचण्या केल्या व त्यात काय निष्पन्न झाले याचे कागदपत्र घेण्यासाठी पोलीस मुंबईला गेले आहेत