खोतकरांचे मंत्रिपद वाचले!

0

औरंगाबाद : निवडणूक अर्ज वेळेवर भरला नाही म्हणून आमदारकी रद्द करण्यात आलेले शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांच्या आमदारकी रद्दला शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळे खोतकर यांची आमदारकी व मंत्रिपद दोन्हीही तूर्त बचावले आहे. त्यांचे राजकीय विरोधक कैलास गोरंट्याल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून खोतकर यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेनंतर अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. असा आक्षेप घेत पराभूत उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर सुनावणीअंती न्यायालयाने खोतकर यांची आमदारकी रद्द केली होती. त्यामुळे त्यांना काल झालेल्या विधानपरिषद पोट निवडणुकीत मतदानही करता आले नव्हते. न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध खोतकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर झालेल्या सुनावणीत खंडपीठाच्या आदेशास सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. खोतकर हे शिवसेनेचे मराठवाड्यातील महत्वाचे नेते असून, त्यांची आमदारकी रद्द होणे हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात होता.