गंगापुत्रीच्या वेदना समजून घ्या !

0

चेतन राजहंस

साध्वी पद्मावतीसारख्या हिंदू महिला गंगारक्षणासाठी केवळ भाषणबाजी न करता त्यांचे आयुष्य पणाला लावत आहेत; मात्र देशभरात त्याची म्हणावीशी नोंद घेतली जात नाही, उलट त्यांच्यावर टीका केली जाते हे दुर्दैवी आहे. साधुसंतांचे खरे कार्य तर भ्रमित झालेल्या समाजाला दिशादर्शन करायचे आहे; पण त्यांनाच आज आंदोलनात उतरावे लागत आहे. खरेतर उपोषणाचे हत्यार सध्याच्या व्यवस्थेमध्ये बोथट ठरले आहे. तसे नसते, तर 3 संतांच्या प्राणार्पणानंतर तरी गंगामातेच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना योजल्या गेल्या असत्या. गंगा नदी ही केवळ पाण्याचा स्त्रोत नाही; तर हिंदूंसाठी ती देवीसमान आहे. गंगा नदीमध्ये स्नान केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. अशी पवित्र गंगानदी मृत्यूपंथाला लागणे, हा निसर्गाला देवतास्वरूप मानणार्या भारतियांच्या सभ्यतेचा पराभवच आहे. गंगेची ही अवहेलना अशीच चालू राहिली तर एक दिवस ही देवनदी मिथकात लुप्त होऊन जाईल!

गंगारक्षणाचे आंदोलन पुन्हा एकदा चर्चेत आले आणि तेही शासन-प्रशासन यांच्या असंवेदनशील वृत्तीमुळे ! हरिद्वार येथील मातृसदन आश्रमामधील साध्वी पद्मावती या गंगारक्षणाच्या आंदोलनासाठी आमरण उपोषण करत होत्या. उपोषणानंतर 47 दिवसांनी त्यांना हरिद्वारच्या पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास कह्यात घेतले आणि रुग्णालयात नेले. ‘प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पोलिसांनी बळजोरीने मला रुग्णालयात नेले आणि माझे उपोषण सोडण्याचा प्रयत्न केला. मला विष देऊन मारून टाकण्याचा त्यांचा डाव होता’, असा गंभीर आरोप साध्वी पद्मावती यांनी केला आहे. पुढे दोन दिवसांनी साध्वींना रुग्णालयातून पुन्हा हरिद्वार येथे सोडण्यात आले.
आतापर्यंत गंगारक्षणाच्या आंदोलनात मातृसदनाशी संलग्न असलेले स्वामी गोकुळानंद, स्वामी निगमानंद आणि स्वामी ज्ञानस्वरुप सानंद (प्रा. जी.डी. अग्रवाल) यांनी गंगामातेचे अस्तित्त्व टिकवण्यासाठी उपोषण आंदोलन करतांना प्राणत्याग केला आहे. या सूचीमध्ये अजून कोणाची भर पडू नये आणि सरकारने साधूसंतांच्या आंदोलनांची नोंद घेऊन गंगारक्षणासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखाव्यात, अशी अपेक्षा आहे. हरिद्वार येथील मातृसदन आश्रम गंगारक्षणासाठी गेल्या 22 वर्षांपासून अविरत प्रयत्नशील आहे. साध्वी पद्मावती यांनी गंगारक्षणासाठी आरंभलेले उपोषण हे मातृसदनाचे 61 वे उपोषण होते. ‘गंगेच्या रक्षणासाठी करण्यात येत असलेले उपोषण हे केवळ उपोषण नाही, तर ती तपश्‍चर्या आहे’, अशी तेथील साधूसंतांची धारणा आहे. दीड वर्षांपूर्वी स्वामी ज्ञानस्वरुप सानंद (प्रा. जी.डी. अग्रवाल) यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गंगानदीच्या रक्षणासाठी आणि तिचे पावित्र्य जपले जपण्यासाठी अजून ठोस प्रयत्न होतील, अशी अपेक्षा होती; पण अजूनही साधूसंत जीवाची बाजी लावून करत असलेल्या उपोषणामुळे ती अपेक्षा तितक्या प्रमाणात पूर्ण झाली नाही, असेच म्हणावे लागेल.

गंगारक्षणाचे आंदोलन कशासाठी ?

गंगामातेच्या रक्षणासाठी ‘गंगा अ‍ॅक्ट’ (कायदा) बनवावा, गंगा नदीवर प्रस्तावित आणि बांधकाम चालू असलेले सर्व बांध निरस्त केले जावेत आणि तेथे खनन करण्यासंबंधी राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनच्या सर्व आदेशांचे पूर्णपणे पालन केले जावे, अशा 4 ते 5 प्रमुख मागण्यांसाठी मातृसदन आश्रमाच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे. गंगा नदी ही भारताची राष्ट्ररुपी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे; कारण ‘आर्य सनातन वैदिक संस्कृती’ गंगेच्या काठावर विकसित झाली; मात्र औद्योगिक कारखान्यांमधून सोडले जाणारे रसायनयुक्त पाणी, मैला, कचरा यामुळे ती सर्वाधिक प्रदूषित नदी बदली. विविध शासकीय परियोजनांमुळे तिचा प्रवाह विरळ आणि खंडित होत चालला आहे. गंगा नदीच्या शुद्धीकरणाचा नाही, तर अस्तित्त्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. गंगेवरील 90 टक्के पाणी धरणांनी शोषून घेतले आहे. गंगेवरील बंधारे, धरणे आणि जलविद्युत प्रकल्प, तसेच गंगेच्या पात्रात होणारी उत्खननकार्ये यांमुळे नदीचा अखंडितपणा आणि वेग यांवर परिणाम होऊन गंगेचा स्वच्छंद प्रवाह समाप्त झाला आहे. मातृसदनमधील साधूसंतांनी उभारलेले आंदोलन यांसाठी आहे. भारतियांना देवीरुप असणारी गंगा निर्मळ आणि प्रदूषितविरहित होण्यासाठी प्रयत्न करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे.

‘नमामि गंगे’ला पूर्णत्व कधी ?

वर्ष 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर गंगा नदीला प्रदूषणाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी त्यांनी ‘नमामि गंगे’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. ‘गंगामातेची सेवा करणे, हे माझे परमभाग्य आहे’, असे उद्गार त्यांनी काढले होते. त्यानंतर सर्व श्रद्धाळू हिंदूंच्या अपेक्षाही उंचावल्या; पण अद्यापपर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. प्रकल्पाची कागदोपत्री यशस्विता आणि वास्तविकता यांमध्ये भेद आहे. कदाचित् म्हणूनच साधूसंतांची उपोषणाची मालिका 2 दशके लोटली तरी चालूच आहे. दीड वर्षांपूर्वी स्वामी सानंद यांच्या देहत्यागानंतर ब्रह्मचारी आत्मबोधानंद यांनी 24 ऑक्टोबर 2018 ला त्यांचे आंदोलन पुढे चालू केले. केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि ‘नमामि गंगा’ या प्रकल्पाचे अधिकारी यांनी मागण्यांची पूर्तता करण्याविषयी मौखिक आणि लिखित आश्‍वासन दिल्यानंतर त्यांनी 194 दिवसांनी म्हणजे 4 मे 2019 या दिवशी उपोषण मागे घेतले; परंतु 6 मासांनंतरही त्या आश्‍वासनांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे तो वारसा पुढे साध्वी पद्मावती यांनी चालवण्याचा निर्णय घेतला आणि त्या 15 डिसेंबरला उपोषणाला बसल्या. ‘जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, भलेही त्यासाठी प्राणार्पण करावे लागले, तरी चालेल’, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. अवघ्या 23 व्या वर्षी श्रद्धास्थानाच्या रक्षणासाठी जीव झोकून देऊन लढण्याचा त्यांचा निर्धार सर्वांनाच प्रेरणादायी आहे.

पर्यावरणरक्षणासाठी प्राणार्पण करणार्‍यांची नोंद घ्या !

काही मासांपूर्वी स्वीडनच्या ग्रेटा थन्बर्ग हिने पर्यावरणाच्या संकटाविषयी भाषण केल्यावर तिला पूर्ण जगात प्रसिद्धी मिळाली. तिच्या धाडसाचे कौतुक आहेच; पण इथे साध्वी पद्मावतीसारख्या हिंदू महिला गंगारक्षणासाठी केवळ भाषणबाजी न करता त्यांचे आयुष्य पणाला लावत आहेत; मात्र देशभरात त्याची म्हणावीशी नोंद घेतली जात नाही, उलट त्यांच्यावर टीका केली जाते, हे दुर्दैवी आहे. साध्वी रुग्णालयात असतांना त्या दोन मासांच्या गर्भवती असल्याचा उल्लेख डून्स मेडिकल महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी केला. त्यावर साध्वींनी 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला प्रविष्ट करणार असल्याचे सांगितले. एका साध्वीची अपकीर्ती करण्याचा हा प्रयत्न अश्‍लाघ्य आहे. साधुसंतांचे खरे कार्य तर भ्रमित झालेल्या समाजाला दिशादर्शन करायचे आहे; पण त्यांनाच आज आंदोलनात उतरावे लागत आहे. खरेतर उपोषणाचे हत्यार सध्याच्या व्यवस्थेमध्ये बोथट ठरले आहे. तसे नसते, तर 3 संतांच्या प्राणार्पणानंतर तरी गंगामातेच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना योजल्या गेल्या असत्या. गंगा नदी ही केवळ पाण्याचा स्त्रोत नाही; तर हिंदूंसाठी ती देवीसमान आहे. गंगा नदीमध्ये स्नान केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. अशी पवित्र गंगानदी मृत्यूपंथाला लागणे, हा निसर्गाला देवतास्वरूप मानणार्या भारतियांच्या सभ्यतेचा पराभवच आहे. गंगेची ही अवहेलना अशीच चालू राहिली तर एक दिवस ही देवनदी मिथकात लुप्त होऊन जाईल!