गंभीरता समजून घ्या!

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा विद्यार्थ्यांशी संवाद अर्थात ‘परीक्षा पे चर्चा’ त्यांच्या विरोधकांसाठी टीकेचा मुद्दा झाला असेल पण या संवादातून मोदींनी नेमक्या मुद्याला हात घातला आहे याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांना आपल्या मुलांकडून असलेल्या अतिरेकी अपेक्षा हा विषय आता नवीन राहिलेला नाही परंतु, दिवसेंदिवस अधिकाधिक टेक्नोसॅव्ही होत असताना स्मार्टफोनसारखे डिव्हाईस आपली वेळ चोरत असल्यावर मोदींनी नेमकेपणाने बोट ठेवले आहे. स्मार्टफोनवर होते काय – सर्फिंग अथवा सोशल मीडियाचा भरमसाठ वापर करत राहणे. याला ‘पडीक’ असे विशेषण लावता येईल का? हे ज्याने त्याने ठरवायचे आहे. असो, देशातील सोशल मीडिया वापरकर्त्यांची संख्या 351 लाखांपलीकडे असल्याचा एका सर्वेक्षणातील अंदाज आहे. सोशल मीडिया म्हणजे पूर्वीसारखे एफबी अथवा ट्विटर अथवा इन्स्टा एवढेच मर्यादित नाही तर या प्रत्येकाला असंख्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. सोशल मीडिया अथवा स्मार्टफोन ‘अ‍ॅडीक्ट’ असणे हा एकप्रकारचा आजार झाला आहे. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी कसे प्रयत्न करावे लागले याच्या बातम्या, लेख गेल्या काही दिवसांत वाचण्यात येत आहेत. आजच्या संवाद कार्यक्रमातून मोदींनी याच पैलूकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. काहींना हा कार्यक्रम टाईमपास वाटला असेल, तर तो त्यांचा दृष्टिकोन आहे. मला तंत्रज्ञान आवडते. मला त्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता असते. तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिकता येते हे सांगताना मोदींनी आपली आवड सांगताना कुठे थांबले पाहिजे हेही लक्षात आणून दिले. ‘मर्यादा’ काय असायला हवी याचे भान आपल्याला हवे याकडे त्यांचा रोख होता. तुम्ही तुमच्या मोबाइलद्वारे रोज 10 शब्द नोट करा, ते शिका. आज व्हॉट्सअ‍ॅप सोशल नेटवर्किंग करत आहे. आम्ही तंत्रज्ञानाच्याद्वारे मित्रांना शुभेच्छा देतो. मात्र असे करत असताना आपल्याला तंत्रज्ञानाचे गुलाम व्हायचे नाही. तंत्रज्ञानाबाबत नक्कीच जाणून घेत राहा, मात्र, त्याचा दुरुपयोग कधीही करू नका, असा कानमंत्रही मोदींनी मुलांना दिला.

एकदा का गुलाम झालात म्हणजे तुमच्यावर अधिराज्य गाजविणारा कोणी तरी असतोच! याबाबतीत विविध प्रकारचे गेम्स आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम हे अत्यंत जळजळीत उदाहरण आहे. पबजीपायी आतापर्यंत अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. दुर्दैवाने यामध्ये शालेय विद्यार्थी व तरुणांचा भरणा अधिक आहे. अशा घटना लक्षात घेता आपण तंत्रज्ञानाचे गुलाम व्हायचे किंवा नाही हे ठरवावे लागते अन्यथा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्मोर्टफोनच्या स्क्रीनवर खालून-वर, वरून-खाली आपली बोटे फिरतच असतात. देशातील प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे स्मार्टफोनवाचून अथवा सोशल मीडियावाचून खूप काही अडून राहिल्याचे ऐकिवात नाही. अखिल भारतीय प्रशासकीय परीक्षेत (आयएएस) अव्वल आलेल्या सृष्टी देशमुख ह्या आपले लक्ष्य गाठेपर्यंत सोशल मीडियापासून लांबच होत्या. प्रवाहात कुठवर वाहत जायचे हे आपणच आपले ठरवायचे असते. यापासून पालकांनी बोध घेण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान मोदींनी इतरही मुद्यांना स्पर्श केला. इयत्ता 10 वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर गोष्टींसाठीही काही वेळ द्यायला हवा. त्यांनी केवळ अभ्यासावरच तेवढे लक्ष केंद्रित करू नये. आपले माईंड फ्रेश करण्यासाठी काही वेगळेही करण्याची आवश्यकता असल्याचे मोदी या कार्यक्रमात म्हणाले. पंतप्रधान सांगताहेत म्हणून नव्हे पण त्यांचेही अनुभवाचे बोल आहेत. अभ्यास एके अभ्यास करण्यात गुंतून राहणारे असे अनेक विद्यार्थी असतात की, ज्यांना वास्तविक जीवनाला सामोरे जाणे जमत नाही. अशांना पुस्तकी किडेही उपरोधिकपणे म्हटले जाते. सिव्हील इंजिनिअर झाला पण घरातील भिंतीवर एक साधा खिळा हातोडीच्या सहाय्याने सरळ ठोकता येत नसेल तर या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला कौशल्य म्हणावे का? ज्यात मन रमेल, असे काही तरी करत राहिले पाहिजे. कुणाला भटकंती करायला तर कुणाला कविता करायला आवडत असेल. एखादा डॉक्टर हा आपल्या वैद्यकीय ज्ञानाच्या व्यतिरिक्त लाकडावर उत्तम कलाकुसर करू शकत असेल किंवा मातीच्या सुबक वस्तू घडविण्यात त्याने हातखंडा मिळवलेला असेल. मन कुठे तरी गुंतविण्याचा, अतिरिक्त ज्ञान संपादन करण्याचा हा एक प्रकार आहे आणि तो प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. अभ्यासाच्या ओझ्याखाली दबू नका. त्याचा ताण आल्यावर तो हलका होईल अशा प्रकारचा विरंगुळा गवसत नसेल तर त्याचे दुष्परिणाम पिछा सोडत नाहीत. अभ्यास उत्तम कराल पण त्याबरोबच प्रत्येक विद्यार्थ्याने आदर्श नागरिकही घडले पाहिजे. देशाची सेवा केली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकानेच सीमेवर जाऊन पहारा देण्याची किंवा युद्ध लढण्याची गरज नाही. अन्य छोट्या छोट्या कृतीतूनही आपल्याला आपली देशभक्ती दाखवून देता येते. वीज-पाण्याचा योग्य उपयोग करणे, तसेच घरातील इतर व्यवस्थांचा योग्य प्रकारे उपयोग करणे ही देखील देशभक्ती आहे, आपण मेक इन इंडियाच्या वस्तू खरेदी केल्या तर त्याचा फायदा देशाला होतो. ते आपले कर्तव्यही आहे. आपल्याला आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडले पाहिजे, अशा शब्दांत देशभक्तीचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. भारताचे लक्ष्य फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आहे. ते साध्य करण्याचे काम एकट्या सरकारचे, प्रशासनाचे नाही. 90 टक्के जबाबदारी नागरिकांची आहे. मोदी मेक इन इंडिया वस्तू खरेदीचा आग्रह धरत आहेत. एकाअर्थी आपल्याच देशातील निर्मित स्वदेशीचा अंगीकार करा हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुसंस्कृत नागरिक कसे होतील यासाठी प्रयत्न होणेे गरजेचे आहे. मोदींनी आपल्या संवादातून केवळ विद्यार्थीच नव्हे, तर पालकांनाही कळकळीचे आवाहन केले आहे. ज्या व्यक्तींचा मोदींच्या अशा कार्यक्रमांना विरोध आहे, त्यांनी मोदी यांचा काही क्षण विचार करू नये पण त्यांनी जे काही सांगितले आहे त्याचा तरी गंभीरपणे विचार करावा.