गणपती विसर्जनासाठी तात्पुरती जेट्टी उभारण्याचा प्रस्ताव 

0 1
उद्योगमंत्र्यांची माहिती,  गणेशोत्सव पूर्व तयारीच्या अनुषंगाने बैठक 
मुंबई: गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी मुंबई शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या दूर केली जाणार आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. येत्या शनिवारपर्यंत याबाबतचा अहवाल प्राप्त होणार असून त्यानंतर खड्ड्यांचा प्रश्न निकाली काढला जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री तसेच मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. याचबरोबर गणेश विसर्जनासाठी चौपाट्यांवर तात्पुरत्या स्वरुपातील जेट्टी उभारण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. यामुळे चौपटीवर उशिरापर्यंत चालणारे विसर्जन विनाविलंब सुरळीत पार पडेल. तसेच किनाऱ्यापासून दूर अंतरावर मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल. यामुळे मूर्तीचे निर्माल्य किनाऱ्यावर येणार नाही. जेट्टी उभारण्याबाबत सर्व बाबी तपासून एका आठवड्यात निर्णय घेतला जाणार आहे.
गणेशोत्सव पूर्व तयारीच्या अनुषंगाने उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी गणेशोत्सवाचे आगमन आणि विसर्जन आदी मुद्यांवर यावेळी साधक बाधक चर्चा करण्यात आली. गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावर्षापासून गणेश मंडळांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. त्यावर काहींनी सूचना कळवल्या. ऑनलाइन सोबत ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, देसाई म्हणाले, ऑनलाइन पद्धत योग्य असून यामुळे एकाच ठिकाणी  पोलिस, महापालिका, अग्निशमन दलाचा परवाना प्राप्त होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मंडळाच्या प्रतिनिधींना वार्डनिहाय प्रशिक्षण देण्याची तयारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दर्शविली. त्याला सर्वांना सहमती दिली.
खड्डाच्या बाबतीत देसाई म्हणाले, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील सर्व खड्ड्यांचा अहवाल तयार करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे. आठवडाभरात कारवाईचा अहवाल सादर केला जाणार आहे. येत्या शनिवारी अहवाल येणार आहे. त्यावर चर्चा करून उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे भरले जातील. आयुक्तांनी तशा सूचना दिलेल्या आहेत. शनिवारी याचा अहवाल त्या खात्यातील अधिकारी सादर करणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे भरले जातील.दरम्यान, शांतता क्षेत्र, छोट्या गल्ल्यातील गणेश मंडळांच्या अडचणी आदी मुद्द्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.
अथर्व शीर्षाचे सामूहिक पठण
यावेळी सिद्धिविनायक न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी गणेशोत्सवात अथर्व शीर्षाचे सामूहिक पठण करण्याबाबत चर्चा केली. गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सामूहिकरित्या अथर्व शीर्षाचे पठण होणार आहे. त्याचे सर्व वाहिन्यांवरून प्रक्षेपण केले जाणार आहे. मुंबईसह राज्यातील सर्व गणेश मंडळात हा उपक्रम राबवला जाणार आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.