गणेश कॉलनीत फटाके फोडणार्‍या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची दुचाकीची तोडफोड !

0

जळगाव: गणेश कॉलनी चौकात चंद्रशेखर अत्तरदे यांच्या कार्यालयसमोर फटाके फोडणार्‍या पाळधी येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाणीसह त्याच्या दुचाकीची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली. अत्तरदे समर्थकांनी तोडफोड तसेच मारहाण केल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे, तर अत्तरदे यांना शिवीगाळ केली, मनाई केल्यानंतर फटाके फोडल्याचा आरोप अत्तरदे समर्थकांनी केला आहे. या घटनेनंतर जिल्हापेठ पोलिसांनी तीन ते चार जणांना ताब्यात घेतले होते.

घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हयासह राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानुसार जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे मताधिक्क्याने विजयी झाले. यानंतर त्यांच्या पाळधी येथील शिवसेनेच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांनी दुपारी 11 वाजेच्या सुमारास चंद्रशेखर अत्तरदे यांच्या कार्यालयासमोर काही अंतरावर फटाके फोडले. यावेळी अत्तरदे समर्थकांनी त्यांना विरोध केला, मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. यानंतर हेच चार ते पाच जण पुन्हा सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या सुमारास फटाके फोडण्यासाठी आले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अत्तरदे यांच्या नावाने शिवीगाळ केला, तसेच मनाई केल्यानंतर फटाके फोडले, त्यामुळे त्याच्या दुचाकीची तोडफोड झाल्याचे अत्तरदे समर्थकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे अत्तरदे यांच्यासह समर्थकांनी मारहाण करुन दुचाकीची तोडफोड केल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान दुचाकीच्या तोडफोडीच्या घटनेनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळाहून पळ काढला होता. घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. या घटनेनंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळाहून पसार होणार्‍या तीन ते चार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर दोन्ही गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले होते. याठिकाणी उशीरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरु होती.