गरजू कुटुंबियांना आरोग्यसेवा, जीवनावश्यक वस्तूंचे कीटचे वाटप

0

नंदुरबार। येथील नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था व बंगलोरचा स्वाती हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील ५०० गरजू कुटुंबियांना लॉकडाऊन काळात आरोग्यसेवा व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन असल्यामुळे गरजूंचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे बंद आहेत. हातावर पोट भरणाऱ्या लोकांचे हाल होऊ नये म्हणून नंदूरबार जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांपासून आरोग्य व सामाजिक सेवेत कार्यरत असलेल्या नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था व बेंगलोर येथील स्वाती हेल्थ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पाचशे गरजू नागरिकांच्या कुटुंबियांना आरोग्यसेवा व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गरजू कुटुंबियांची यादी तयार करण्यात आलेली आहे. त्या यादीनुसार प्रत्येक कुटुंबीयांना वस्तुंचे वाटप करण्यात येत आहे. यात खांडबारा, तळोदा,नंदुरबार व शहादा तालुक्यातील ५०० लाभार्थींचा समावेश आहे. या कार्यासाठी नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गढवी, शितल शक्य, राजेंद्र पाटील, समीर वळवी, शेख नासिर, हेमंत पगारे, शोभा मराठे परिश्रम घेत आहेत.