गाडगेबाबा अभियांत्रिकीतील अभियंत्यांच्या कौशल्यावर विश्वास -आशिष श्रीवास्तव

0

 श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीत 207 विद्यार्थ्यांनी दिल्या मुलाखती

भुसावळ- पुणे, मुंबई, नाशिक परीसरातील महाविद्यालयांमध्येच किंवा त्या-त्या भौगोलिक क्षेत्रातील अभियंत्यांना इन्फोसीस, एल.एन.टी., टेक महिंद्रा, विप्रो व इतर महाकाय माहिती तंत्रज्ञान किंवा अभियांत्रिकी कंपनीमध्ये संधी मिळते हा समाजातील एक मोठा गैरसमज असल्याचे भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या अभियंत्यांनी सिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी इन्फोसीसचा गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या विविध अभियंत्यांच्या कौशल्यावर विश्वास आहे, असे मत इन्फोसीस टीमचे एच.आर.मॅनेजर आशिष श्रीवास्तव यांनी मांडले. भुसावळ शहरातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकॉम, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्सच्या आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी 14 मार्च रोजी महाविद्यालयात आयोजित इन्फोसिस कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह दरम्यान ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या 207 आजी-माजी विद्यार्थ्यांनी कॅम्पस इंटरव्हू दिला.

आजी-माजी विद्यार्थ्यांची होणार निवड
महाविद्यालयातील अभियंत्यांचे कौशल्य, तंत्रज्ञानाची ओळख व रोजगार निष्ठा ह्या बाबी पडताळून आजी-माजी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इंटेल, याहू, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम इत्यादी कंपनीच्या प्रोजेक्टसाठी सुविधा पुरविणे व त्यांच्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.

207 आजी-माजी विद्यार्थ्यांनी दिल्या मुलाखती
महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकॉम विभागातील 45, कॉम्प्युटर सायन्स विभागातील 60 तसेच मेकॅनिकल विभागातील 55, इलेक्ट्रिकल विभागातील 35, व सिव्हिल विभागातील 12 आजी-माजी विद्यार्थ्यांनी गटचर्चा, पर्सनल इंटरव्ह्यू, टेक्निकल राऊंड, टेलिफोनीक इंटरव्ह्यू दिले. याची तयारी महाविद्यालयातील ‘ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट सेल’ मार्फत करून घेतली गेली होती.

चांगल्या प्लेसमेंटची परंपरा कायम राखण्यासाठी प्रयन्त:
भुसावळात विभागात कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी इन्फोसिस येण्याची ही पहिलीच वेळ आहे. श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाने चांगल्या ‘प्लेसमेंट’ची परंपरा कायम राखण्यासाठी निरंतर प्रयत्न सुरू असल्याचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी सांगितले.

महाविद्यालयीन शिबिर उपयुक्त -अश्‍विनी जावळे
महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधा, बुध्दीमत्ता, व्यक्तीमत्व विकास कार्यक्रमांमुळे फायदा झाला. माझे विज्ञानाचे मूलभूत ज्ञान आणि संवादाचे कौशल्य वाढवण्यासाठी महाविद्यालयाने आयोजित केलेले शिबिर महत्त्वाचे ठरले आणि मला इन्फोसीसच्या एच.आर.मॅनेजर यांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य मिळाल्याची भावना इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकॉम विभागाची विद्यार्थिनी अश्विनी जावळे हिने व्यक्त केली.