गिरीश महाजन आठ जागांचे शिवधनुष्य पेलणार का?

0

विरोधकांचा धुव्वा उडविण्यात माहीर; प्रतिष्ठा पणाला

जळगाव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक मानले जाणारे राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी शक्तिकेंद्र प्रमुखांच्या संमेलनात उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांची जबाबदारी स्वीकारली असल्याचे जाहीर केले होते. महापालिका किंवा नगरपालिकांप्रमाणे ही निवडणूक सोपी नसून आठ जागा निवडून आणण्याचे हे शिवधनुष्य ना. गिरीश महाजन पेलतील का? या विषयावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. अद्याप उमेदवार जाहीर झाले नसले तरी आठही जागा निवडून आणण्यासाठी ना. महाजनांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. 

महाजनांच्या नेतृत्वात विजयाचा धडाकालोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेमध्ये सध्या उमेदवारीवरून खल सुरू आहे. दि. 16 रोजी भाजपाच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होणार असून या बैठकीत उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपा सध्याच्या काळात ‘इलेक्शन विनर’ आणि संकटमोचक म्हणून ख्याती प्राप्त केलेल्या ना. गिरीश महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रातील भाजपाच्या सहा जागांसह सेनेच्या दोन अशा युतीच्या आठ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी स्विकारली आहे. ना. महाजनांचे स्टार म्हणा की राजकीय डावपेच म्हणा त्यांना आत्तापर्यंत सोपविण्यात आलेल्या प्रत्येक जबाबदारीवर ते खरे उतरले आहे. जळगाव महापालिका, जामनेर नगरपालिका, धुळे महापालिका, नगर महापालिका, नाशिक महापालिका, शेंदुर्णी नगरपालिका या सर्वच ठिकाणी त्यांनी रणनीती आखून भाजपाचा झेंडा रोवला आहे. त्यामुळे सध्याच्या काळात ना. गिरीश महाजन हे भाजपासाठी ‘स्टार’ आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही ना. गिरीश महाजनांची भूमिका आणि शब्द हा प्रमाण मानला जात असल्याचे चित्र आहे.  ‘सुजय’च्या रूपाने विरोधकांची शिकार  राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांना भाजपामध्ये आणण्याची जबाबदारीही ना. महाजनांवर सोपविण्यात आली होती. त्यादृष्टीने ना. महाजनांनी राजकीय हातखंडे वापरून सुजय विखे पाटील यांना भाजपात घेऊन विरोधकांची शिकार केली. या शिकारीने काँग्रेससह राष्ट्रवादीतही खळबळ उडवून देत आपल्या राजकीय हातचलाखीचा परीचय देखील करून दिला. हाच कित्ता त्यांनी नाशिक, जळगाव, धुळे, नगर महापालिका निवडणुकीत गिरवला होता.

समन्वयाची जबाबदारी   उत्तर महाराष्ट्रात युतीच्या नाशिक, दिंडोरी, रावेर, जळगाव, धुळे, नंदुरबार, शिर्डी आणि अहमदनगर या आठ जागा निवडून आणण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेने संयुक्तरित्या समन्वय समिती तयार केली आहे. त्यात शिवसेनेचे मंत्री ना. दादाजी भुसे आणि ना. गिरीश महाजन यांचा समावेश आहे. ना. महाजनांची यात मोठी जबाबदारी आहे. जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांचे आत्तापर्यंतचे सर्व फासे हे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे त्यांचे केंद्रातही मोठे वजन वाढले आहे. आता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील भाजपाच्या सहा आणि शिवसेनेच्या दोन अशा आठ जागा निवडून आणण्यासाठी ना. महाजनांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पवारांची बारामती जिंकण्याची भाषा 

गेल्या दीड वर्षात उत्तर महाराष्ट्रातील महापालिका आणि नगरपालिकांमध्ये मिळालेल्या विजयामुळे ना.गिरीश महाजन यांचा आत्मविश्‍वास कमालीचा वाढला आहे. यातूनच त्यांनी शरद पवारांची बारामती जिंकून दाखवण्याची तयारी दर्शविली आहे.