गुजरातमधील कोविड सेंटरला आग; मोदींकडून आर्थिक मदत जाहीर

0 1

अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबादमध्ये असलेल्या नवरंपुऱ्यातील कोविड सेंटरला भीषण आग लागली. रात्री ही घटना घडली. या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. या घटनेत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४० जणांना यातून वाचविण्यात यश आले आहे. या घटनेवरून संपूर्ण देशात दु:ख व्यक्त होत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेत मृत झालेल्या रुग्णाच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमी झालेल्यांना ५० हजाराची मदत जाहीर केले आहे. पंतप्रधान सहायता निधीतून ही मदत करण्यात येणार आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनीदेखील या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) संगीता सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

या रुग्णालयातील सर्व रुग्णांना शेजारीच असलेल्या एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयात चौथ्या मजल्यावर असलेल्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.