गोजोरे विविध कार्यकारी सोसायटीत 46 लाखांचा अपहार

0

वार्षिक लेखा परीक्षणात अपहार झाला उघड ; मयत चेअरमनसह सचिव व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदाधिकार्‍याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा

भुसावळ- तालुक्यातील गोजोरे येथील विविध कार्यकारी सोसायटीत चेअरमनसह सचिव व जिल्हा बँक अधिकार्‍यांनी संगनमत करून तब्बल 46 लाखांच्या रकमेवर डल्ला मारल्याची बाब वार्षिक लेखा परीक्षणादरम्यान उघड झाल्याने तिघाही पदाधिकार्‍यांविरुद्ध बुधवारी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात आरोपी तथा चेअरमन काही महिन्यांपूर्वीच मयत झाले आहेत. 2017-18 या वर्षाच्या लेखा परीक्षणात तिघाही पदाधिकार्‍यांनी 46 लाख 17 हजार 36 रुपयांवर डल्ला मारल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सहाय्यक निबंधकांच्या परवागीनंतर प्रमाणित लेखा परीक्षकांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

लेखा परीक्षणात अपहार झाला उघड
नाशिक विभागाचे प्रमाणित लेखा परीक्षक राजेश गोविंदा बुंधे (42, शिरसोली, जि.जळगाव) यांनी गोजोरे विविध कार्यकारी सोसायटीचे 2018-2019 या वर्षाचे वार्षिक लेखा परीक्षण केल्यानंतर कर्ज वसुलीचे एक लाख 69 हजार 109 रुपये तसेच पहिले कर्ज असताना दिलेले कर्ज 92 हजार 100 रुपये तसेच शिल्लक रक्कम मिळून 46 लाख 17 हजार 36 रुपये 80 पैशांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले या प्रकरणी बुधवारी सचिव अशोक तुकाराम धांडे, चेअरमन ओंकार विठ्ठल वारके (मयत) तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बाबूराव बंडु बोदवडे यांच्याविरुद्ध तालुका पेालिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 4 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 दरम्यान वेळोवेळी संस्थेत पदाधिकार्‍यांनी अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यापूर्वी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, भुसावळ यांच्याकडे अहवाल सादर केल्यानंतर त्यांनी परवानगी दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी बाबूराव बोदवडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याने हा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. तपास उपनिरीक्षक गजानन करेवाड करीत आहेत.