पोलिसांच्या दुर्लक्षीत धोरणामूळे चौकीत वेडसर महिलेचा रहिवास : उद्घाटनाच्या दुसर्याच दिवसापासून चौकी पडली बंदल ः बंद चौक्यांकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
भुसावळ- शहरातील विस्तारीत भागातील नागरीकांच्या समस्या सोडवण्यासाठी गोपाळ नगर भागात पोलिसांनी पोलीस चौकी सुरू केली असलीतरी चौकीच्या उद्घाटनानंतर दुसर्याच दिवशी ही चौकी बंद पडली ती आजतागायत बंदच आहे. मनुष्यबळाच्या अभावाचे कारण देत पोलीस प्रशासनाने या भागाकडे दुर्लक्ष केल्याने गोपाळ पोलीस चौकीला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या चौकीत पोलिसांऐवजी चक्क वेडसर महिलेने रहिवास सुरू केला आहे. पोलीस प्रशासनाच्या एकूणच बेफिकीबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
टवाळखोरांचा उपद्रव वाढला
शहरातील उत्तर भागातील शांतीनगर, गोपाळ नगर व इतर विस्तारीत भागातील चोरी व इतर गुन्ह्यांवर पोलिसांचा अंकुश रहावा यासाठी पोलीस प्रशासनाने शहर पोलीस ठाण्यातंर्गत गोपाळ नगर भागात गोपाळ नगर या नावाने पोलीस चौकी सुरू केली आहे. या पोलीस चौकीत सुरूवातीच्या काळात दैनंदिन दोन पोलीस कर्मचार्यांची नियुक्तीही केली जात होती. यामुळे या भागातील टवाळखोर व इतर गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्यास मदत झाली होती. यामुळे परीसरातील नागरीकांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला होता मात्र पोलीस अधिकार्यांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे या पोलीस चौकीत कर्मचार्यांची नियुक्ती केली जात नसल्याने या भागात टवाळखोरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे तसेच पोलीस चौकी पोलीस कर्मचार्यांअभावी सतत बंद राहत असल्याने पोलीस चौकीला गवताचा वेढा पडून कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ईतकेच नव्हेतर बंदावस्थेत असलेल्या या पोलीस चौकीच्या व्हरांड्यात चक्क एका महिलेने आपला रहिवास सुरू केला आहे. यामुळे या परीसरातील नागरीकांमध्ये पोलीस प्रशासनाच्या कारभाराविषयी आश्चर्ययुक्त नाराजी व्यक्त केली जात आहे.
चौकीच्या उद्घानंतर चौकी पडली बंद
गोपाळ नगरातील या पोलीस चौकीची देखभाल व दुरूस्तीअभावी मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. यामुळे या चौकीत एकही कर्मचारी आपले कर्तव्य बजावण्यास तयार होत नव्हता. याची शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांच्या पुढाकाराने या पोलीस चौकीचे लोकसहभागातून नुतनीकरण करण्यात आले व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, आमदार संजय सावकारे ,नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, प्रांताधिकारी आदींच्या उपस्थितीत पोलीस चौकीचा लोकार्पण सोहळा व पोलीस मित्र मेळावा सुद्धा झाला होता. विशेष म्हणजे पोलीस चौकी उद्घाटनानंतर बंद पडणार नाही, अशी ग्वाही डॉ.सुपेकर यांनी दिली होती मात्र दुसर्याच दिवशी मनुष्यबळाचे कारण देत चौकी बंद करण्यात आली ती आजतागायत बंदच आहे.
लगतच नगरपालिकेचे कार्यालय
गोपाळ पोलीस चौकीलगतच नगरपालिकेच्या कार्यालयाचे स्थलांतर झाले आहे. यामुळे नगरपालिकेच्या या कार्यालयात नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी व प्रशासकीय अधिकार्यांचा दिवसभर या भागात राबता असतो मात्र या पदाधिकार्यांचे व पोलीस प्रशासनाचे पोलीस चौकीचा परीसरात निर्माण झालेल्या कचराकुंडीकडे दुर्लक्ष होत असल्याची खेदजनक बाब असल्याचे समोर आले आहे.
टवाळखोरांचा उपद्रव वाढला
गोपाळ नगर भागात पोलीस चौकी पुन्हा सुरू झाल्याने त्या कालावधीत या भागातील टवाळखोरांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला होता मात्र पोलीस चौकीला पुन्हा दुरवस्थेचे गतवैभव प्राप्त झाल्याने या भागातील टवाळखोरांचा उपद्रव व भुरट्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने दखल घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.