गोळेगावातील मुलाच्या खूनप्रकरणी पित्याची निर्दोष सुटका

0

भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निकाल ; गुन्ह्यानंतर आरोपी पिता कोठडीत ; आता सुटकेचा मार्ग मोकळा

भुसावळ- शेती नावावर करून देण्याच्या कारणावरून पिता-पूत्रात झालेल्या वादानंतर पित्यानेच मुलाचा खून केल्याची घटना बोदवड तालुक्यातील गोळेगाव येथे 2015 मध्ये घडली होती. या प्रकरणी भुसावळ सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. या गुन्ह्यात संशयीत आरोपी असलेल्या व गुन्ह्यानंतर कारागृहातच असलेल्या पित्याची भुसावळ न्यायालयाने शुक्रवारी सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली. गोळेगाव 5 ऑक्टोबर 2015 रोजी रात्री साडेनऊ वाजता मुलगा वैभव संजय पाटील व त्याचे वडील आरोपी संजय रामराव पाटील यांच्यात शेती नावावर करण्याच्या कारणावरून वाद झाला. याच रात्री पहाटे तीन वाजता संजय पाटील यांनी मुलगा वैभवच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार केला व जखमी अवस्थेतील वैभवला जळगाव सिव्हील हॉस्पीटलमध्ये हलवल्यानंतर मृत घोषित करण्यात आले होते. या प्रकरणी वैभवचा भाऊ हर्षलने वडील संजय पाटील यांच्याविरुध्द खुनाची फिर्याद बोदवड पोलिस ठाण्यात दिली होती. हर्षलची आई आशाबाई प्रत्यक्षदर्शी व अन्य 12 साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले तसेच वैद्यकिय अधिकारी व तपास अधिकार्‍यांचे जबाब घेण्यात आले. या प्रकरणी युक्तीवाद होऊन शुक्रवार, 1 मार्च रोजी न्या.एस.पी.डोरले यांची सबळ पुराव्याअभावी संशयीत आरोपी संजय रामराव पाटील यांची निर्दोष मुक्तता केली. गुन्हा घडल्यापासून संशयीत आरोपी कारागृहात होता. आरोपीतर्फे अ‍ॅड.प्रफुल्ल पाटील यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड.किशोर पाटील यांनी सहकार्य केले.