घनकचरा प्रकल्प निविदेस आचारसंहितेचा ब्रेक

0

प्रकल्पाची 12 कोटींची निविदा ; 16 महिन्यात होणार प्रकल्प कार्यान्वित
जुना प्रकल्प स्क्रॅप करण्याच्या कामाला सुरुवात

जळगाव। राज्य शासनाकडून जळगाव महापालिकेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करण्यात आला असून यासाठी 31 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यापैकी 9 कोटी रुपये शासनाने मनपाला वर्ग केले आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आत्तापर्यंत वेगवेगळ्या कारणाने रखडला होता. त्यानंतर बहुप्रतीक्षेनंतर या प्रकल्पाअंतर्गत प्रक्रिया प्रकल्पासाठी 12 कोटी रुपयांची निविदा मनपाकडून काढण्यात आली आहे. नगरविकास विभागाने दि.1 मार्च 2018 रोजी जळगाव शहर घनकचरा प्रकल्पासाठी 31 कोटींचा डीपीआर मंजूर केला असून या प्रकल्पाकरीता निधीचा पहिला टप्पा 9 कोटी रुपयांचा महापालिकेला वर्ग देखील केला आहे. नुकतीच या प्रकल्पाअंतर्गत कचरा प्रक्रिया प्रकल्पाची 12 कोटींची निविदा काढण्यात आली असून निविदेलादेखील आचारसंहितेचा ब्रेक लागला आहे.

16 महिन्यांचा कालावधी प्रकल्प उभा राहण्याकरीता लागणार असल्याने हा प्रकल्प कचरा प्रक्रिया करण्याकरीता कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मिटणार असून सद्यस्थितीत असलेल्या डंम्प केलेल्या कचर्‍यामुळे परिसरात होणारे दुष्परिणाम टाळता येणार आहेत. या प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल 9 कोटींचा निधी महापालिकेस 8-10 महिन्यांपूर्वी प्राप्त झाला आहे. मात्र, आतापर्यंत आरोग्य विभागाकडून विविध वाहने व साहित्य खरेदी व्यतिरिक्त अन्य कोणतेही काम दिसून येत नव्हते. जवळपास वर्षभरापासून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडल्यामुळे योग्यवेळी यासंदर्भात पावले उचलली न गेल्यास प्राप्त निधी देखील परत जाण्याची भिती व्यक्त केली जात होती. तसेच नगररविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडून वारंवार आढावा घेतला जात होता. तसेच वारंवार सूचना करुनदेखील प्रकल्पाला गती मिळत नसल्याने त्यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे.

मनपाद्वारे वाहनांची खरेदी
जळगाव शहराची सुमारे 5 लाख 21 हजार 733 लोकसंख्या असून 1 लाख 14 हजार 666 मिळकती आहेत. शहरातून 220 टन कचरा संकलित करण्यात येतो. त्या दृष्टीने घनकचरा प्रकल्प ही नितांत गरज असतांनादेखील या प्रकल्पाचे काम अतिशय संत गतीने सुरु आहे. या प्रकल्पाअंतर्गत 85 घंटा गाड्या, 7 कॉम्पॅक्टर, 2 डंपर, 27 कचरा संकलित करण्यासाठी हातगाड्या, 2 जेसीबी मशीन व 2 वॉटर टँकर खरेदी करण्यात आले आहेत. त्यापैकी 2 जेसीबी व 85 घंटागाड्या मनपात दाखल झाल्या आहेत. तसेच उर्वरीत वाहनेही उपलब्ध होणार आहे.

कचरा संकलन केंद्राचा अभाव
शहरातून दैनंदिन कचरा संकलित केल्यानंतर एकत्र करण्याकरीता तीन ठिकाणी कचरा संकलन केंद्र उभारावे लागणार आहे. प्रभागामधून कचरा संकलित केल्यावर संकलित कचरा कॉम्पॅक्टरद्वारे डंपरच्या सहाय्याने घनकचरा प्रकल्पापर्यंत पोहचविला जाणार आहे. मात्र, अद्याप मनपा प्रशासनाकडून असे कचरा संकलन केंद्र निश्चित करण्यात आलेले नसल्याचे दिसून येते.

जुने साहित्य स्क्रॅप, बायोमायनिंगचे काम सुरु
मनपाने 1999-2000 मध्ये सायप्रस कंपनीला खत प्रकल्प बीओटी तत्वावर दिला होता. त्यानुसार 13 वर्षांनी हा प्रकल्प कंपनीने मशिनरीसह मनपाला विनाशुल्क हस्तांतरीत करावयाचा होता. त्यासाठी मनपाने शेड उभारणीसाठीची जागा दिली होती. तसेच सुरक्षाही पुरविली होती; परंतु कराराचा भंग करुन सायप्रस कंपनीने गाशा गुंडाळला. त्यानंतर मनपाने मे 2007 मध्ये हंजीर बायोटेक पुणे यांच्याशी मनपाच्या आव्हाणे शिवारातील जागेवर बीओटी तत्वावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यासाठी करार केला होता. या प्रकल्पाकडे मनपा प्रशासन व पदाधिकार्‍यांचेही अक्षम्य दुर्लक्ष झाले. त्यामुळे हा प्रकल्प मक्तेदाराने आग लागल्याचे निमित्त करीत परस्पर दि.24 जून 2013 पासून बंद केला आहे. त्यामुळे नवीन प्रकल्प उभारणीकरीता आधिचे साहित्य व इतर बिनकामाच्या वस्तुचे स्क्रॅप करण्याचेही टेंडर देण्यात आले आहे. तसेच हे सर्व साहित्य स्क्रॅप करुन सद्यस्थितीत असलेला कचरा व माती वेगळी करण्याचे(बायो मायनिंग) कामदेखील ठेकेदारामार्फत करण्यात येणार आहे.