चहार्डीच्या बेपत्ता विद्यार्थ्याचा अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने खून

0

आईसह तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात ; 23 दिवसानंतर खुनाचा उलगडा

चोपडा- तालुक्यातील चहार्डी येथील 12 वर्षीय बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याचा अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने सख्या आईसह दोन संशयीतांनी खून केल्याची बाब उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आईसह दोघा संशयीतांना ताब्यात घेतले असून संशयीतांनी घटनास्थळापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या खदानीत विद्यार्थ्याची बॉडी फेकल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. दरम्यान, सुरुवातीला नरबळीच्या संशयातून या विद्यार्थ्याचा खून झाल्याने 23 दिवसांपासून पोलिस यंत्रणा कामाला लागली होती मात्र गुन्ह्याचा उलगडा झाल्याने पोलिसांनाही दिलासा मिळाला आहे.

अपर पोलिस अधीक्षकांच्या पथकाकडून खुनाचा उलगडा
चहार्डी येथील मंगेश दगडू पाटील (12) हा 2 फेब्रुवारी रोजी आजोबा लोटन राघो पाटील यांना शौचास घेऊन जातो, असे सांगून गेला होता मात्र त्यानंतर तो परत न आल्याने वडील दगडू लोटन पाटील यांनी सुरुवातीला चोपडा पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता तर दुसर्‍या दिवशी मंगळवारी सरपंच उषाबाई पाटील यांचा मुलगा दत्तात्रय हा पाण्याचा खाजगी हाळ भरण्यासाठी आला असता या हाळजवळ तुटलेला पाय दिसून आल्याने या विद्यार्थ्याची नरबळीच्या उद्देशाने हत्या झाल्याची चर्चा सुरू झाली होती. विद्यार्थी गायब झाल्याच्या दिवसापासून पोलिसांनी गावात ठाण मांडून जाबजवाब घेतले तसेच श्‍वान पथकाला पाचारण करून मृतदेह शोधण्याचाही प्रयत्न केला मात्र यश आले नव्हते तसेच गावात आलेल्या भिक्षेकर्‍याने अपहरण केल्याने त्याचे छायाचित्रही जारी केले होते मात्र त्यानंतरही खुनाचा उलगडा होत नव्हता. चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी गोकुळ सोनवणे यांना गोपनीय माहिती काढण्यासाठी पाठवल्यानंतर अनैतिक संबंधात हा विद्यार्थी अडथळा ठरल्याने त्याचा काढण्यात आल्याची बाब पुढे आली.

आईचे अनैतिक संबंध उघड झाल्याने विद्यार्थ्याचा बळी
मयत मंगेश पाटील (12) हा शौचालयाला गेल्यानंतर घरी परतला असता आई गीताबाई शामराव पाटील ही संशयीत राजेंद्र पाटीलसोबत नको त्या अवस्थेत दिसल्याने मंगेशने वाद घातला तर गीताबाई यांचा भाचा समाधान पाटील हादेखील त्याचवेळी आल्यानंतर तिघांनी मिळून मंगेशचा खून करीत मृतदेह गोणपाटात लपवून ठेवला व शौचालयाच्या ठिकाणी मंगेशच्या चपला, रक्ताने माखलेेले कपडे टाकून त्याचे अपहरण करून खून झाल्याचा बनाव करण्यात आला. आरोपींनी नंतर हा मृतदेह घटनास्थळापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरील खाडीत टाकण्यात आल्याची कबुली पोलिसांना दिल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी दिली. गीताबाई यांचे भाच्याशीदेखील अनैतिक संबंध असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

आज खाडीत मृतदेहाचा शोध घेणार
चोपडा पोलिसांनी या प्रकरणात संशयीत म्हणून गीताबाई, राजेश पाटील व समाधान पाटील यांना चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी सकाळी संशयीतांनी मृतदेह ज्या खाडीत टाकला तेथे मयत मंगेशच्या मृतदेहाचा शोध घेतला जाणार आहे. या गुन्ह्यात तपासाधिकारी सहाय्यक निरीक्षक मनोज पवार यांनीदेखील उत्कृष्टरीत्या तपास केल्याचे अपर अधीक्षक बच्छाव म्हणाले.