चहार्डी खूनप्रकरणी तिघा आरोपींना 5 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

0

अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने मातेसह तिघा आरोपींनी काढला 12 वर्षीय चिमुकल्याचा काटा ; खदानीत दिवसभर मृतदेहाचा शोध

चोपडा- तालुक्यातील चहार्डी येथील 12 वर्षीय बेपत्ता असलेल्या चिमुकल्याचा अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने आईसह दोन संशयीतांनी खून करीत काटा काढल्याने सोमवारी तिघाही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. मंगळवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता 5 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, मयत मंगेश पाटील (12) या चिमूकल्याचा आरोपींनी खदानीत मृतदेह फेकल्याची कबुली दिल्यावरून धुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाने मंगळवारी दिवसभर मृतदेह शोधला मात्र यश आले नाही.

अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने मुलाचाच केला खून
चहार्डी येथील मंगेश दगडू पाटील (12) हा बालकाचे सुरुवातीला गुप्तधनासाठी अपहरण करून खून केल्याची चर्चा रंगली होती शिवाय पोलिसांचा तपासही त्यादृष्टीने सुरू होता मात्र चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी गोकुळ सोनवणे यांना गोपनीय माहिती काढण्यासाठी पाठवल्यानंतर अनैतिक संबंधात हा चिमुकला अडथळा ठरल्याने त्याचा काटा काढण्यात आल्याची बाब स्पष्ट झाल्यानंतर मयत विद्यार्थ्याच्या आईसह तिघांच्या मुसक्या सोमवारी आवळण्यात आल्या होत्या.

आरोपींना न्यायालयाने सुनावली 5 पर्यंत पोलिस कोठडी
मयत मंगेश पाटील (12) या विद्यार्थ्याची आई गीताबाई पाटील हिचे संशयीत राजेंद्र पाटील व भाचा समाधान पाटीलसोबत अनैतिक संबंध होते तर 2 फेब्रुवारी रोजी मंगेश शौचालयाहून परतल्यानंतर आईला राजेंद्र पाटील यांच्यासोबत त्याने ‘नको त्या अवस्थेत’ पाहिल्याने घरात मोठा वाद झाला होता. यावेळी तीनही आरोपींनी मिळून मंगेशचा खून करून मृतदेह गोणपाटात टाकून खदानीत फेकला तर शौचालयाच्या ठिकाणी मंगेशच्या चपला, रक्ताने माखलेेले कपडे टाकून त्याचे अपहरण करून खून झाल्याचा बनाव केला होता. दरम्यान, चोपडा पोलिसांनी सोमवारी तीनही आरोपींना अटक केल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. न्यायालयात या गुन्ह्याचे तपासाधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, चोपड्याचे प्रभारी निरीक्षक मनोज पवार उपस्थित होते.

दिवसभर शोधानंतरही मिळाला नाही मृतदेह
संशयीत आरोपींनी ज्या खाडीत मृतदेह टाकला तेथे प्रचंड पाणी असल्यानंतर मंगळवारी धुळे येथील राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाला पाचारण करण्यात आले. या दलाचे निरीक्षक सपळकर व त्यांच्या 15 सहकार्‍यांनी बोटी तसेच स्विमींगच्या सहाय्याने मयत मंगेशचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला मात्र सायंकाळपर्यंत यश आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.