चांगदेव मुक्ताबाई माघ वारी यात्रोत्सवासाठी 300 वर दिंड्या दाखल

0 2

मुक्ताईनगर- माघ कृष्ण विजया एकादशी व महाशिवरात्री पर्वकाळावर वारकरी संप्रदायाचे आद्य संतपीठ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे चांगदेव मुक्ताबाई यात्रोत्सवात 300 वर दिंड्यासह लाखावर भाविक दाखल झाले आहेत. सर्वदूर हरी नामाचा गजर आदिशक्ती मुक्ताईच्या जयघोषाने मुक्ताईनगर दुमदुमून गेले आहे.

पहाटे मुक्ताबाईचा अभिषेक
एकादशीच्या पर्व काळावर भाविकांनी तापीपूर्णा संगमावर स्नान केले. पहाटे चार वाजता आदिशक्ती मुक्ताईचे मानकरी व अध्यक्ष अ‍ॅड.भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांनी संत मुक्ताबाईचा महाअभिषेक केला. पाच वाजता खासदार रक्षा खडसे व मानाचे वारकरी मधुकर रघुनाथ नारखेडे (निमखेड, जि.बुलढाणा) यांनी मुक्ताई अभिषेक व आरती केली. यावेळी महानंदा दुध फेडरेशन चेअरमन मंद खडसे, कोथळी पोलिस पाटील संजय चौधरी, व्यवस्थापक उद्धव जुनारे, प्रा.झोपे, पुजारी व्यवहारे महाराज उपस्थित होते. संत मुक्ताई नवीन मंदिरात पहाटे चार वाजता संस्थानचे विश्वस्त पंजाबराव पाटील यांनी सपत्नीक महापूजा केली. पौरोहित्य रवींद्र महाराज हरणे यांनी केले. नवीन मंदिरात फराळाची व्यवस्था मुरलीधर गंगाराम पाटील केराळा यांनी केली.

सर्वत्र संत मुक्ताईचा गजर
संत मुक्ताबाई समाधीस्थळी सकाळपासून दिंड्या नगर फेरीस बाहेर पडल्या त्यामुळे भक्तिमय वातावरणात निर्माण झाले. भाविक दर्शनासाठी आल्यानंतर दर्शन बारीसाठी दूरवर रांगा लागल्या. जुन्या मुक्ताई मंदिरात भाविकांना फराळाची व्यवस्था अनिरुद्ध पांढरकर श्याम व्यवहारे यांनी केली तसेच दर्शन बारी मध्ये पाण्याची व्यवस्था मुक्ताईनगर सिविल सोसायटीने केली आहे. महाशिवरात्री दिनी 4 रोजी आदिशक्ती संत मुक्ताबाई आपल्या लाडक्या शिष्य योगी चांगदेव भेटीसाठी सकळ वारकरी दिंड्यासह चांगदेव निघणार आहे.

मानाच्या वारकर्‍यांचा सत्कार
संत मुक्ताबाईच्या पूजा-आरतीचा मान यावर्षी सुशीला व मधुकर रघुनाथ नारखेडे (रा.निमखेड , जि.बुलढाणा) या वारकरी दाम्पत्याला मिळाला. त्यांचा सन्मान संस्थान अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील व खासदार रक्षा खडसे यांनी महावस्त्र, मुक्ताबाई प्रतिमा व ग्रंथ देवून केला.