चाळीसगावात तलवार मिरवणुकीला जनसागर उसळला

0 1

पिर मुसा कादरी ऊर्फ बामोशी बाबा उरुसाला उत्साहात सुरूवात

चाळीसगाव – येथील हिन्दू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला हजरत पिर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांच्या उरुसाला २१ पासून प्रारंभ झाला असून काल शुक्रवारी बाबांच्या दर्ग्यास गुलाब पाणी, अत्तर, दुधाने शाही स्नान करण्यात आले. तर सायंकाळी संदल मिरवणूकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते.तर आज सायं. ६ वा. तलवार मिरवणूकीला दर्शनासाठी भक्तांचा जनसागर उसळला. व्यापारी संघाचे प्रदीप देशमुख, प्रदीप देवराव देशमुख, राजु देशमुख यांनी तलवारीची विधिवत पूजा केली. हजारो हिंदू मुस्लिम बांधव या तलवार मिरवणुकीत सहभागी झाले होते.

तलवार मिरवणुकीचे प्रकाश देशमुख मानकरी
यंदा पूज्य तलवार मिरवणुकीचा मान देशमुख घराण्यातील प्रकाश मधुकर देशमुख यांना मिळाला. तलवार मिरवणुकीची दोनशे वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. विशेषतः हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित सहभागी झाल्याने या तलवार मिरवणुकीची राज्यात मोठी चर्चा होते. सायंकाळी ६ वा. तलवारीची मिरवणूक निघाली. तर रात्री ११ वा. ही मिरवणूक दर्ग्यावर पोहोचली. रज्जबच्या १४ व्या दिवशी पिर मुसा कादरी बाबांचा अंत काळ झाला असे मानले जाते. त्याच दिवशी उरूस भरवला जातो. १५ व्यादिवशी देशमुखांच्या वाड्यातून तलवार वाजत-गाजत मिरवणुकीने आणली जाते. उरुस काळात मनोकामना पूर्ण होण्यासाठी दर्ग्यावर भक्तांकडून हजारो चादर अर्पण केल्या जातात. दोन-तीन दिवसांनी ही तलवार परत देशमुख वाड्यात नेली जाते.

तृतीयपंथी ही सहभागी
उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. उरुसात येणार्‍या अडचणीवर मात करण्यासाठी तहसील, नगरपालिका, पोलीस ,वीज वितरण कंपनी ,आरोग्य विभागासह सर्वच यंत्रणेने कंबर कसली असून यात्रोत्सवात दर्शनासाठी दरवर्षी देशाच्या कानाकोपर्यातून लाखो भाविकांची उपस्थिती असते. त्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाते आहे. दर्ग्यावर व परिसरात ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली असून आज दर्ग्यावर अनेक भाविकांकडून चादर चढवून प्रार्थना करण्यात आली आहे. यंदाही तृतीयपंथीयांना बरोबर तमाशा कलावंत सहभागी झाले आहेत. त्यांचेकडून वाजतगाजत चादर चढविण्यात आली.

सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त
यात्रोत्सवा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उपविभागीय अधिकारी नजीर शेख, तहसिलदार अमोल मोरे, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांचेसह २ पोलीस निरीक्षक, ५ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १५४ पोलीस कर्मचारी, १२ महिला पोलिस कर्मचारी, एक आरसीपी प्लॅटून तसेच २० होमगार्ड पोलीस ताफा सहभागी झाला आहे. उरूसानिमीत्त कायदा व सुव्यस्था चोख राहावी म्हणून वॉकीटॉकी आणि दुर्बिणीसह बंदोबस्त उरूसात लावण्यात आला आहे. पोलिसांची करडी नजर या उरुस काळात राहणार आहे.

बाबांचा ऐतिहासिक दर्गा
शहराच्या पश्चिमेस डोंगरी नदीतीरावर लिंबाच्या झाडांनी वेढलेला दर्गा पिर मुसा कादरी बाबा या नावाने परिचित आहे. या दर्ग्याच्या बांधकामावर तारखेच्या बांधकामावरून हा दर्गा सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा असल्याचे मानले जाते. हा दर्गा म्हणजे पिर मुसा कादरी यांची कबर आहे. या ठिकाणी एक लंबाकृती कबर आहे. चारही बाजूस फरशी बसवली आहे. प्रवेशावर हिंदू देवळाच्या गोपुरा प्रमाणे बांधले आहे. नदीच्याच्या बाजूने दगडी भिंत बांधुन भराव घालून तटबंदी केली आहे.

बामोशी देव बाबा एक आख्यायिका
पिर मुसा कादरी यांच्या आगमनाबाबत एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी या विभागात तेली राज्य होते ते भिल्लांच्या रणधुमाळी मुळे मोडकळीस आले त्याचा फायदा राजस्थानातून आलेल्या जाधवसिंग व जालमसिंग यांनी घेत जहागिरी मिळवली.त्यांनी या ठिकाणी असलेल्या गढीवर निवासस्थान केले पुढे त्यांचे वंशज पतंगराव देशमुख हे कारभार चालवीत त्यांची पत्नी चोपडा येथील होती. ते अचानक वारले असता त्यांचे वारस धनाजी हे वयाने लहान होते त्यामुळे धनाजीच्या आईवर पालनपोषणाची जबाबदारी आली या कुटुंबात कुटुंबात भाऊबंदकीत वितुष्ट होते .चोपडा येथील गुरु अवलिया पिर मुसा कादरी हे धनाजीच्या आईचे गुरु होते. तेव्हा धनाजीच्या आईने गुरूंना विनंती केली की, आपण माझ्या जहागिरीत येऊन राहिला तर मला आशीर्वाद व आधार मिळेल त्यानुसार ते चाळीसगाव येथे येऊन राहिले मात्र ते गावात न राहता गावाच्या पैलतीरी मुस्लिम स्मशानभूमीतील चिंचेच्या वनातील एका खेड्यात त्यांनी निवासस्थान केले या निवासस्थानी त्यांना सकाळ-सायंकाळ देशमुखांकडून दूध व मिर्झा कडून जेवण जात असे त्यांचा मृत्यू काळ जवळ आला तेव्हा त्यांनी त्यांच्या जवळील हिरे व माणिकांचा हार मिर्झा यांना दिला व तलवार धनाजी देशमुख यांना दिली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची की कबर त्यांच्या निवासस्थानी बांधली आहे तोच आजचा बामोशी बाबा दर्गा.