चिंचोलीत मांडूळ सर्प व एअरगनसह आरोपी जाळ्यात

0

यावल पोलिसांची कारवाई : विना क्रमांकाची दुचाकी जप्त

यावल- तालुक्यातील चिंचोली गावातून मांडूळसह एअरमन बाळगणार्‍या आरोपीच्या यावल पोलिसांनी मुसक्या आवळल्या. राणा छगन बारेला (21) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या ताब्यातून विना क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली. दरम्यान, मांडूळाच्या तस्करीसाठी आरोपी चिंचोलीत आल्याचा संशय आहे.

पोलिस पाटलाची सतर्कता आली कामी
यावलचे निरीक्षक अरुण धनवडे व सहकारी गस्त घालत असताना चिंचोली पोलिस पाटील राकेश वासुदेव पाटील यांनी गावात विना क्रमांकाच्या दुचाकीवरून संशयास्पद इसम फिरत असल्याची माहिती दिली. धनवडे यांनी तत्काळ गावात धाव घेतली. उपनिरीक्षक खांडबहाले, हवालदार संजय तायडे, हवालदार सुनील तायडे, विकास सोनवणे, चालक रोहील गणेश यांनी आरोपी पळून जात असताना पाठलाग करून त्यास पकडले. आरोपीच्या ताब्यातून एक फुटाची एअरगन, विना क्रमांकाची दुचाकी तसेच चार फुटांचा तपकिरी रंगाचा मांडूळ जातीचा सापही जप्त करण्यात आला. मांडूळ जातीच्या सापाला यावल वन विभागाचे अधिकारी कुठे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी सांगितले.